प्रमुख नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:06 AM2019-08-04T00:06:55+5:302019-08-04T00:07:09+5:30
भिवंडी तालुक्यात पूरस्थिती । भातशेती, भाजीपाला पीक पाण्याखाली, ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूककोंडी
भिवंडी : तालुक्यातील वारणा, कामवारी, तानसा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने भिवंडी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांत पुराचे पाणी शिरल्याने घर आणि दुकानांतील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. तर ग्रामीण भागात भातशेती पाण्याखाली जाऊ न तिला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे भात आणि भाजीपाला पीक कुजून नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. भिवंडी-वसई मार्गावरील खारबाव, वडघर, डुंगे, वडूनवघर आदी खाडीकिनारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात खाडीचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. तसेच ग्रामीण आणि शहरी भागात अनेक ठिकाणी रात्रीपासून वीजही गायब होती.
रात्रभर कोसळणाºया पावसामुळे भिवंडीकरांची दाणादाण उडाली आहे. शहरातील निजामपूरा, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, भाजीमार्केट, नझराना कम्पाउंड, नदीनाका, कारिवली, समरूबाग अशा सखल भागात पाणी साचल्यामुळे व्यापारी आणि रहिवाशांचे खूपच हाल झाले. निजामपूर पोलीस चौकीही पाण्याखाली गेली होती. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याण रोड, अंजूरफाटा, रांजणोली बायपास नाका, वंजारपट्टी नाका, नारपोली व शेलार, माणकोली, वडपे बायपास नाका अशा विविध मार्गांवरील वाहतूक कोलमडून पडली होती. तर मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. रांजणोली बायपास नाका येथील रस्त्यावर पाणी साचल्याने साईबाबा मंदिराजवळील कल्याणकडे जाणारा मार्ग काहीवेळ बंद ठेवण्यात आला होता. तर, बायपास नाक्यावर असलेल्या टाटा आमंत्रण नागरी वस्तीत पाणी शिरल्यामुळे रहिवासी इमारतींमध्ये अडकून पडले होते.
कामवारी नदीसह वारणा नदीही दुथडी भरून वाहत आहे. भिवंडी-पारोळ रोडवरील कांबे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर तसेच नदीनाका आणि खोणी पुलावरून पाणी वाहू लागल्याने जुनांदुर्खी, कांबे, टेंभवली, पालिवली, गाणे, फिरिंगपाडा, लाखिवली, चिंबीपाडा, कुहे, आंबरराई, कुहे, खडकी, भुईशेत, माजिवडे, धामणे, वाण्याचा पाडा तसेच शेलार, बोरपाडा, कवाड, अनगाव, पिळजे आदी गावांचा भिवंडी शहराशी संपर्कतुटला आहे. तालुक्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हाडा कॉलनी, ईदगाह रोड या कामवारी नदीकाठच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना आवश्यकता पडल्यास राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांनी दिली.
उल्हास नदीने पुन्हा गाठली धोकादायक पातळी
बदलापूर : बदलापूर शहरातून वाहणाºया उल्हास नदीने पुन्हा धोक्याची पातळी गाठली आहे. रात्रीपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पात्रातील पाणी पुन्हा शहराच्या दिशेने येत होते. दुपारी १२ वाजता पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना या पाण्याचा धोका निर्माण झाला नाही. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटेपासून मुसळधार पाऊ स झाल्याने उल्हास नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली होती. नदीकिनारी राहणाऱ्यांना पुन्हा सतर्क करण्यात आले होते. नदी पात्राजवळ जाण्यास बंदी घालण्यात आली होती. पालिकेचे पथक शहरात पूरस्थितीची पाहणी करत होते. मात्र शहरात पाणी गेले नाही. आधीच पाण्यात सर्वस्वी गमावलेल्या कुटुंबीयांनी कोसळणाºया पावसाचा धसका घेतला होता. हीच परिस्थिती वालिवली गावाच्या परिसरातही निर्माण झाली आहे. दोन्ही पुलांखालून वाहणाºया पाण्याचा प्रवाह वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली होती.
शेलार नदीनाका रस्ता पाण्याखाली, वाहतूककोंडी
अनगाव : भिवंडी-वाडा महामार्गावरील शेलार नदीनाका रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पुराचे पाणी घरात आणि दुकानात शिरल्याने रात्र जागून काढावी लागली. शेलार ग्रामपंचायत आणि भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या या रस्त्याच्या दुतर्फा डाइंग कंपन्या आणि इमारतीच बेकायदा बांधकामे झालेली आहेत. तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेल्या गटारांवर डाइंग कंपनीमालकाने बांधिकमे केल्याने पाणी रस्त्यावर येऊ न वाहतूकीला फटका बसला. शेलार, निदनाका, मीठपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारती आणि डाइंग कंपनीची बांधकामे आहेत. भिवंडी-वाडा रस्यात मोठमोठे खड्डेही वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे
केळठण पुलावरून पाणी, गावांचा संपर्क तुटला
वज्रेश्वरी : मुसळधार पावसामुळे वज्रेश्वरीतील तानसा नदीला पूर येऊन नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. तसेच नदीवर असलेल्या केळठण पुलावरून पाणी वाहू लागल्याने सात ते आट गावांचा संपर्क तुटला आहे. अकलोली येथील प्रसिद्ध गरम पाण्याची कुंडांच्या परिसरही पाण्याखाली गेला आहे. तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी, अकलोली आणि गणेशपुरी या गावांच्या जवळून तानसा नदी वाहते. या नदीला आलेल्या पुरामुळे अकलोली आणि गणेशपुरी येथील सुमारे २५ ते ३० घरांमध्ये पाणी घुसले. अचानक घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळठण येथील साई मंदिरातही पुराचे पाणी शिरले होते. या नदीवर असलेला वज्रेश्वरी-केळठण या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने पलीकडील केळठण, गोराड, निंबवली, चांबळा, डाकिवली आदी सात ते आठ गाव-पाड्यांचा संपर्क तुटला. वजे्रेश्वरी ते अकलोली बससेवाही ठप्प झाली होती.