अतिधोकादायक इमारत दुरुस्ती सोमवारपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 05:50 AM2019-11-15T05:50:23+5:302019-11-15T05:50:29+5:30
मुंब्य्रातील इमारतीच्या रहिवाशांनी अखेर दुरु स्तीसाठी इमारत खाली करण्याची तयारी दर्शवल्यामुळे सोमवारपासून तिच्या दुरु स्तीला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे.
मुंब्रा : आठ दिवसांमध्ये दोन रूमच्या छताचे स्लॅब कोसळल्यामुळे अतिधोकादायक झालेल्या सी २ ए श्रेणीतील मुंब्य्रातील इमारतीच्या रहिवाशांनी अखेर दुरु स्तीसाठी इमारत खाली करण्याची तयारी दर्शवल्यामुळे सोमवारपासून तिच्या दुरु स्तीला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे.
येथील कौसा भागातील घासवाला कम्पाउंडमधील ख्वाजा पॅलेस या गृहसंकुलाच्या तळ अधिक चार मजली इमारतीच्या सी विंगमधील सदनिका क्र मांक ४०३ आणि २०४ च्या छताच्या स्लॅबचा काही भाग मागील काही दिवसांपूर्वी कोसळला होता. ही बाब इमारतीमधील सोसायटीच्या सदस्यांनी तसेच सदनिकाधारकांनी प्रशासनापासून लपवून पडलेल्या स्लॅबच्या दुरु स्तीचे काम खाजगी अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले होते. मात्र, या कामामध्ये अनेक तांत्रिक चुका आढळून आल्याने सुरू असलेली दुरु स्ती पूर्ण झाल्यानंतरही इमारतीमधील २२ कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार कायम राहणार असल्याची बाब मुंब्रा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून इमारतीमधील रहिवाशांबरोबर सखोल चर्चा करून अलीकडेच ठामपाच्या पॅनलमधील अभियंत्याकडून तिचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. त्याचा तपशील सोमवारी येणार आहे. तो आल्यानंतर इमारत त्वरित पूर्ण रिकामी करून दुरु स्ती सुरू करण्यात येणार आहे. इमारतीमधील कुटुंबांनीही याला मान्यता दिली असून स्लॅब कोसळलेल्या रूमचा वापर न करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांनी लोकमतला दिली.