येरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 06:00 PM2018-04-24T18:00:16+5:302018-04-24T18:00:16+5:30
जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना 14 दिवसांच्या संचीत रजेवर आलेला आरोपी हा 12 मार्च 2000 रोजी फरार झाला आहे.
अंबरनाथ : जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना 14 दिवसांच्या संचीत रजेवर आलेला आरोपी हा 12 मार्च 2000 रोजी फरार झाला आहे. सुट्टी संपल्यावर त्याने पुन्हा येरवडा तुरुंगात हरज होणे अपेक्षित होते. मात्र तो हजर झाला नव्हता. त्याच्यावर कायदेशिर कारवाई सुरु असतांनाच 18 वर्षानंतर या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुवापाडा येथे राहणारा दंडप्पा पुजारी (37) हा गुन्हेगार हत्येच्या प्रकरणात येरवडा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. ही हत्या 1991 मध्ये झाली होती. त्या प्रकरणात त्याला 1995 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असतांना पुजारी हा 26 फेब्रुवारीला 14 दिवसांच्या संचित रजेवर बाहेर आला होता. मात्र त्यानंतर तो पुन्हा 12 मार्चला येरवडा तुरुंगात पुन्हा हजर होणो अपेक्षित होते. मात्र तो तुरुंगात हजर झालाच नाही. संचित रजेवर बाहेर पडलेल्या आरोपीच्या विरोधात जी कारवाई करणो अपेक्षित होते ती कारवाई त्या काळात करण्यात आली. ती प्रक्रिया सुरु असतांनाच येरवडा तुरुंग प्रशासनाने या आरोपी विरोधात 18 वर्षानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 18 वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. तुरुंगरक्षक जितेंद्र बांदल यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात नेमके काय घडले याचा तपास पोलीस करित आहेत. ज्या वेळेस हा आरोपी फरार झाला होता त्या वेळेस आरोपीच्या विरोधात फरार झाल्याची न्यायालयीन प्रक्रिया करावी लागत होती. त्या काळात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नव्हती. मात्र 2013 मध्ये नवीन आदेश आल्यावर तुरुंगातुन रजेवर गेलेला आरोपी फळाल्यास त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्याचे अधिकार दिले आहेत. या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे एका तुरुंग अधिका-याने लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले. मात्र 2013 ला आलेल्या आदेशानंतरही 4 वर्षानंतर गुन्हा दाखल झाल्याने हा विलंब का झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.