‘तो’ अधिकारी ठरला राजकारणाचा बळी; चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:50 AM2019-11-22T00:50:44+5:302019-11-22T00:50:52+5:30
सोशल मीडियावर चर्चा, धडक कारवाईमुळे केले लक्ष्य
ठाणे : महिला कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याच्या आरोपावरून वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या एका अधिकाºयाला शासनाच्या सेवेत परत पाठविण्याचा निर्णय मंगळवारी महासभेने घेतला. या विषयावरून संतापलेल्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तर या अधिकाºयाने वागळे इस्टेट प्रभाग समितीत पाय न ठेवण्याचा इशारा दिला आहे. पण त्याचवेळी संबंधित अधिकारी राजकारणाचा बळी तर ठरला नाही ना, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर फिरण्यास सुरुवात झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
हा अधिकारी अचानक सर्वच नगरसेवकांसाठी वाईट कसा झाला, असा प्रश्न या संदेशात करण्यात आला आहे. ज्या महिलेला त्याने वारंवार त्रास दिला, त्या महिलेने याबाबत महापालिका अथवा पोलिसांकडे का तक्र ार केली नाही, असे प्रश्नही करण्यात आले आहेत.
एखाद्यावर आरोप करण्याआधी किंवा त्याला बदनाम करण्याआधी वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. परंतु नैसर्गिकन्यायाचा वापर न करता एका अधिकाºयाचा बळी देणे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या अधिकाºयाने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवायांनी कोण दुखावले होते, हातगाड्यांवरील कारवाई थांबविण्यासाठी कोण दबाव आणत होते, शांतीनगर परिसरातल्या कारवाया थांबवण्यासाठी कोणी दबाब आणला, गॅरेजेस तोडताना कारवाई कोणी थांबविली, अशी प्रश्नांची मालिका या संदेशांमध्ये करण्यात आली आहे.
चौकशीसाठी नेमली अधिकाऱ्यांची समिती
महासभेत संबंधित अधिकाºयावर झालेल्या आरोपानंतर अखेर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भात चार वरिष्ठ अधिकाºयांची समिती नेमली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त संदीप माळवी, कार्मिक अधिकारी वर्षा दीक्षित आणि सहायक आयुक्त चारुशीला पंडित यांचा त्यात समावेश आहे. ही समिती आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असून सोमवार किंवा मंगळवारी आपला अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत.