112 रुपये लिटरने पेट्रोल घेतले, राष्ट्रवादीने गुलाब देऊन अन् पेढे वाटून केला सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:30 PM2021-10-20T17:30:43+5:302021-10-20T17:31:33+5:30
महाग पेट्रोल घेणार्या वाहनधारकांचा केला सत्कार
ठाणे - ठाण्यात बुधवारी पेट्रोलचे दर ११२ रुपयांवर गेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. महागाईतही इंधन भरणार्या वाहनधारकांचा पेट्रोल पंपावरच राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढ मागे घेण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथे इंधन भरणार्या वाहनधारकांना चक्क गुलाबपुष्प देऊन तसेच त्यांना मिठाई भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिषेक पुसाळकर यांनी सांगितले की, महागाईचा आगडोंब उसळला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्या मोदी सरकारने इंधनाचे दर सोन्याच्या दराजवळ नेण्याचा ‘कट’ आखला आहे. याची कल्पना असूनही तोंड दाबून बुक्क्याचा मार जनतेला सहन करावा लागत आहे. हा मार सहन करणार्या वाहनधारकांचा आम्ही पेढे भरवून आणि फुले देऊन सत्कार करण्यात आला. आज जर या महागाईविरोधात सामान्य जनता बंड करणार नसेल तर उद्या आपणाला जगणेही असह्य होणार आहे. याची जाणीव वाहनधारकांना व्हावी, यासाठीच हे आंदोलन केले आहे. यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.