8.2 फूट उंचीचा 'तो' उपचारांसाठी मुंबईत आला अन् चौकशीत अडकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 12:29 AM2019-03-11T00:29:57+5:302019-03-11T07:04:20+5:30
शेर खानवर २४ तास प्रश्नांचा भडीमार; जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच व्यक्ती असल्याचे उघड
ठाणे : जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच व्यक्ती असलेल्या अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेर खान याला एका फोनमुळे संशयित म्हणून ताब्यात घेऊ न त्याची २४ तासांहून अधिक वेळ पोलिसांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान प्रश्नांच्या भडीमारामुळे अनेकदा त्याची चिडचिडही झाली. मात्र काही क्षणात तो शांत होऊ न पुन्हा उत्तरे देत होता. त्याच्याकडे ९ ते १० महिन्यांचा व्हिझिटिंग व्हिसा असून तो मुंबईत दातांवर उपचार करण्यासाठी आला होता. पुरेसे पैसे नसल्याने तो पठाणी व्यक्तींकडे ते मिळवण्यासाठी हिंडत होता. यापूर्वीही आपण चार वेळा भारतात आलो असून उर्दू-हिंदी आणि अफगाणची पश्टू या भाषा येत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले.
शेर खान हा रविवारी टिटवाळा लोकलने प्रवास करत होता. त्याला अंबरनाथला जायचे होते. विक्रोळीला एका प्रवाशाची त्याच्या भारदस्त शरीरयष्टीकडे लक्ष गेले. संशय आल्याने त्याने ठाणे रेल्वे स्थानकात फोन करून याबाबत माहिती दिली. सावधगिरी म्हणून जीआरपी, आरपीएफ, श्वान पथक या सुरक्षा यंत्रणेने तत्काळ रेल्वे स्थानकाचा ताबा घेतला. टिटवाळा लोकल ठाण्यात पोहोचताच शेर खान प्रवास करत असलेल्या डब्यातून सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊ न लोकलची तपासणी केली. त्यात काहीच आढळले नाही. त्यानंतर जीआरपी पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा दहशतवादविरोधी पथकही जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथून रात्री शेर खानला मुंबईत नेऊ न त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान शेर खानने त्याचा पासपोर्ट, व्हिसा आदी कागदपत्रे दाखवली. आपण जगातील दुसºया क्रमांकाची उंच व्यक्ती असून लोक माझ्यासोबत फोटो काढतात. माझी उंची ८.२ फूट असून यू-ट्युब व्हिडीओही असल्याचे त्याने सांगितले. अवघे २७ वर्षांच्या असलेल्या शेर खानला पाच भावंडे आहेत, असे सांगत त्याने चौकशीत कौटुंबिक पार्श्वभूमी स्पष्ट केली. चौकशीमध्ये संशयास्पद असे काहीच उघड झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दर्ग्याच्या आवारात काढल्या रात्री
अफगाणिस्तानमध्ये आपला ड्रायफूटचा व्यवसाय होता. तेथील तणावाच्या परिस्थितीमुळे व्यवसाय बुडाला. दातांवर उपचार करण्यासाठी येथे आलो. पैसे नसल्याने पठाणांकडे मदत मागण्यासाठी फिरत आहोत. भारतात आल्यावर पुरेसे पैसे नसल्याने हॉटेलमध्ये राहणे पडवत नाही. त्यामुळे ओळखीच्या लोकांकडे किंवा दर्ग्याच्या आवारात राहतो. भारतात कुठल्याही दर्ग्यामध्ये नमाज पढण्यासाठी बंदी नाही. भारतात चार वेळा आल्याचेही त्याने चौकशीत सांगितले. उंचीमुळे त्याला खुर्चीतही धड बसता येत नव्हते, असे सूत्रांनी सांगितले