‘तो’ दीड तास जिवावर बेतला!
By admin | Published: December 26, 2015 01:06 AM2015-12-26T01:06:38+5:302015-12-26T01:06:38+5:30
रमेश गुंजाळ यांच्यावर हल्ला झाला, त्या वेळेस मोरिवली उद्यानात बसलेल्या नागरिकांची आणि मोरिवलीच्या नाक्यावर नाका कामगारांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. पण, हल्ला
अंबरनाथ : रमेश गुंजाळ यांच्यावर हल्ला झाला, त्या वेळेस मोरिवली उद्यानात बसलेल्या नागरिकांची आणि मोरिवलीच्या नाक्यावर नाका कामगारांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. पण, हल्ला झाल्यावर त्यांना लागलीच उपचारासाठी नेण्यात आले नाही. जेथे हलविण्यात आले, त्या रुग्णालयात उपचाराची पुरेशी सोय नव्हती. तब्बल दीड तासानंतर त्यांना कल्याणच्या रुग्णालयात हलविण्यात आले. हा दीड तासच गुंजाळ यांच्या जिवावर बेतला.
सकाळी ९.३० वाजता हल्ला झाल्यावर साधारण १० ते १५ मिनिटे गुंजाळ तेथेच पडून होते. त्यानंतर, त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी गाडीच मिळाली नाही. अखेर, तेथे असलेल्या टेम्पोतून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचाराची पुरेशी सुविधा नसल्याने पुन्हा त्यांना ९.५५ वाजता उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. तेव्हाही त्यांना लागलीच नेण्यासाठी कोणतीच गाडी उपलब्ध नव्हती की, रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे त्यांना एका रिक्षातूनच उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. रक्तस्राव सुरूच राहिल्याने आणि हृदयाचे ठोके कमी होत गेल्याने पुन्हा त्यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तोवर, सकाळचे ११ वाजले. हल्ला झाल्यापासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होईपर्यंत तब्बल दीड तास गेला. याच
काळात योग्य उपचार न मिळाल्याने गुंजाळ यांची प्रकृती ढासळली आणि जेव्हा खऱ्या अर्थाने उपचार सुरू करण्यात आले, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
ना शॉकचा उपयोग, ना इंजेक्शनचा
कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा गुंजाळ यांची प्रकृती पूर्ण ढासळलेली होती. शरीरात रक्तपुरवठा करणेही अवघड जात होते. उपचाराला कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. हृदयाचे ठोकेदेखील मिळत नसल्याने त्यांना पन्नासपेक्षा अधिक इलेक्ट्रीकचे झटके देऊन हृदयक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न झाला.
एवढ्यावरच न थांबता मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी जी इंजेक्शन दिली जातात, ती चार इंजेक्शनही त्यांना देण्यात आली. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. अखेर, डॉक्टरांचे अडीच तासांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि गुंजाळ यांना मृत घोषित करण्यात आले.