डोळखांबजवळ तरसाचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:10+5:302021-04-04T04:42:10+5:30
शेणवा : शहापूर तालुक्यातील जंगलात वणव्याचे सत्र सुरूच असून, फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत ३० ते ३५ ठिकाणी ...
शेणवा : शहापूर तालुक्यातील जंगलात वणव्याचे सत्र सुरूच असून, फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत ३० ते ३५ ठिकाणी लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर क्षेत्रातील वनसंपदेसह पशुपक्ष्यांचे अन्नही जळून खाक झाले आहे. अन्न व पिण्याच्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येणाऱ्या तरसाचा मृत्यू झाला.
वणवा रोखण्यासाठी वन विभागाकडून लाखो रुपये निधी मंजूर होऊनही वणवा रोखण्यास मात्र वनविभागाला पूर्णतः अपयश आले आहे. दरम्यान, अन्न व पिण्याच्या पाण्याच्या शोधात मानव वस्तीकडे येणाऱ्या बिबट्याला खर्डी व बेडीसगावाजवळ रस्ता ओलांडताना जीव गमवावा लागला होता तर एका नीलगायीलाही वाहनाच्या धडकेत जीव गमवावा लागल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली आहे. आता डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील हेदवली गावाजवळ तरसाचा मृत्यू झाला आहे. ही घटना समजताच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
दरम्यान, तरसाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून शवविच्छेदनासाठी शहापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. शवविच्छेदनातूनच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे वनपाल हरिश्चंद्र भोईर यांनी सांगितले.