ठाण्यात चाकूचे वार करुन रिक्षातील प्रवाशाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:52 PM2020-10-15T23:52:53+5:302020-10-15T23:55:15+5:30
चाकूचे वार करुन रिक्षातील जयराज जोमनीनाडा (५०, रा. पद्मानगर, ठाणे ) या हमालाकडील तीन हजारांची रोकड लुबाडल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास खारेगाव जवळील मुंबई नाशिक महामार्गावर घडली. या घटनेने रिक्षा प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चाकूचे वार करुन रिक्षातील जयराज जोमनीनाडा (५०, रा. पद्मानगर, ठाणे ) या हमालाकडील तीन हजारांची रोकड लुबाडल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावर घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयराज हे भिवंडी येथे जाण्यासाठी १४ आॅक्टोबर रोजी २ वाजण्याच्या रिक्षाची वाट पहात उभे होते. त्यावेळी पाठीमागे तीन अनोळखी प्रवासी असलेली रिक्षा त्यांच्याजवळ थांबली. तेंव्हा तिघांनी त्यांच्यापैकी एकाला रिक्षातच डिक्कीवर मागे जाण्यास सांगितले. त्यानंतर उर्वरित दोघांनी जयराज यांना मध्यभागी बसविले. थोडयाच वेळाने त्यांच्याकडील पैसे काढण्यासाठी खिसे तपासले. या झटापटीमध्ये त्यांनी प्रतिकार केला असता, दोघांपैकी उजव्या बाजूकडील भामटयाने चाकू काढून त्यांच्या छातीवर, पोटावर, खांद्यावर आणि दोन्ही हातांच्या दंडावर आणि मनगटावर वार करुन गंभीर जखमी केले. नंतर त्यांच्याकडून तीन हजारांची रोकड काढून घेतली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रुती शिंदे या अधिक तपास करीत आहेत.