स्वत:च्या जीवाची काळजी न करता ‘त्यांनी’ रुग्णांना काढले बाहेर; धुरामुळे घुसमटला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 11:34 PM2021-04-28T23:34:07+5:302021-04-28T23:34:12+5:30
धुरामुळे घुसमटला जीव : लोखंडाच्या खिडक्या तोडल्या
कुमार बडदे
मुंब्रा : येथील प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयाच्या तळ मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात आतमध्ये जाण्यासाठी तसेच बाहेर येण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे. पहिल्या माळ्यावर लागलेल्या आगीचा धूर काही क्षणातच तळ मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात पसरला. या धुरामुळे उपचारांसाठी दाखल असलेले सहा रुग्ण तसेच त्याच्यांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांचा जीव घुसमटला होता.
प्रवेशद्वारातदेखील धूर पसरला होता. यामुळे आतमध्ये जाऊन रुग्णांना बाहेर काढण्यासाठी कुणीही धजावत नव्हते. यामुळे जीव वाचविण्यासाठी रुग्णांचा आक्रोश क्षणाक्षणाला वाढत होता. धुरामुळे मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढणे शक्य नसल्याचे लक्षात येताच रुग्णालयाच्या जवळच असलेल्या जहूर चाळीतील आवेश मुजावर, फैसल अन्सारी, जमिर नाखवा, तनवीर मलिक, सरवेज मुजावर, रशीद अन्सारी, इब्राहिम खान यांनी रुग्णालयाच्या मागे असलेल्या खिडकीच्या काचा फोडून, लोखंडाच्या खिडक्या तोडून रुग्णांना बाहेर काढले.
... वाचवू न शकल्याची खंत : नाखवा
रुग्णांना बाहेर काढण्यासाठी आतमध्ये गेलेल्या इब्राहिम, सवरेज यांचीही घुरामुळे घुसमट होत होती. परंतु, त्यांनी तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी त्याची तमा न बाळगता अतिदक्षता विभागातील रुग्णांना बाहेर काढले. ज्यांना बाहेर काढले त्यापैकी चौघांचा नंतर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे कळताच त्यांनी हळहळ व्यक्त करून त्यांना वाचवू न शकल्याबद्दल खंत व्यक्त केली. ज्यांचा मृत्यू झाला त्यांना जर वेळेत बाहेर काढून त्यांच्यावर त्वरित उपचार केले असते तर ते वाचले असते, असे नाखवा म्हणाले.