'जो वाचन करतो, तो वाया जात नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 08:55 AM2024-02-25T08:55:07+5:302024-02-25T08:55:25+5:30
मराठी भाषेसाठी जी आव्हाने आहेत, त्यामध्ये मराठी ही ज्ञानार्जनाची आणि अर्थाजनाची भाषा नसल्याने, मराठी समोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत.
- अभिजीत बांगर
आयुक्त, ठाणे महापालिका
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाचन कसे केले पाहिजे, कुठली पुस्तके वाचली पाहिजे, कशी वाचली पाहिजेत, याच्या अनेक थेअरी आहेत, यामध्ये वेळ महत्त्वाचा नाही, प्रत्येक व्यक्तीला जसे भावेल तसे त्याने वाचन केले पाहिजे. जो माणूस वाचन करतो तो माणूस वाया जात नाही.
आनंदासाठी वाचत असाल तर ती महत्त्वाची बाब आहे. कारण आपल्या विचारात प्रगल्भता आणायची, किंवा अर्थार्जनासाठी आपण वाचतो तर ते अयोग्य नाही, परंतु ते कितपत यशस्वी होईल याबद्दल शाश्वती नाही. मराठीच्या बाबतीत असे बोलले जाते की, मराठी भाषेसाठी जी आव्हाने आहेत, त्यामध्ये मराठी ही ज्ञानार्जनाची आणि अर्थाजनाची भाषा नसल्याने, मराठी समोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत.
मॉलमध्ये पुस्तक प्रदर्शन ही कौतुकास्पद कल्पना
मॉलमध्ये पुस्तक प्रदर्शन ही फार वेगळी कल्पना आहे, कारण या ठिकाणी येणारा वर्ग हा वेगळा आहे, बऱ्याच मॉलमध्ये क्रॉसवर्ड आहे, अशा ठिकाणी जाऊन पुस्तके वाचा, खरेदी करा. पुस्तकांचे प्रदर्शन पाहणे ही निश्चित सुखकारक बाब आहे. या पुस्तक प्रदर्शनाला कुसुमाग्रजांचे नाव देणे हे कौतुकास्पद असून याला दुसरे समर्पक नाव असूच शकत नाही.
सोशल मीडियावर पुस्तकांची थप्पी नकाे
वाचनाचा आनंद ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. वाचनाबाबत माझा दोन वर्षांचा अनुभव असा आहे की, वाचनापाशीच ती गोष्ट संपली की, त्याचा पूर्णत्वाने फायदा होईल, असे नाही. वाचनामध्ये ललित लेखनापासून ते अगदी आपल्या व्यवसायाशी निगडित, टेक्नॉलॉजीशी संबंधित पुस्तके वाचा. परंतु जोपर्यंत तुम्ही त्या पुस्तकांशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची आवड निर्माण होणार नाही. सोशल मीडियातही पुस्तक एक प्रदर्शनाचा भाग झाला आहे, पुस्तक वाचायचे सोशल मीडियावर टाकायचे, पुस्तकाची थप्पी एका वर्षात वाचली, असे अभिमानाने मिरवायचे. तीच थप्पी सोशल मीडियावर टाकणार नसाल, तर तुम्ही नक्की वाचाल. वाचन संस्कृतीबाबत आपण अनेकदा चर्चा करतो, चर्चासत्र घडवून आणतो; पण प्रत्यक्षात वाचन करतो का? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारत नाही.