विमा कंपन्यांची उचलेगिरी पोलिसांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:51 AM2018-07-17T02:51:03+5:302018-07-17T02:51:07+5:30
दिवसेंदिवस वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे गुन्ह्यांचा आलेख ठाण्यात वाढताना दिसतो आहे.
- पंकज रोडेकर
ठाणे : दिवसेंदिवस वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे गुन्ह्यांचा आलेख ठाण्यात वाढताना दिसतो आहे. त्यातच या वाहनचोरीमुळे शहर पोलिसांची डोकेदुखी होऊन बसली आहे. या प्रकरणांचा तपास करताना, कळव्यात चोरीला गेलेल्या दोन दुचाकी इन्शुरन्स कंपन्यांनी उचलून नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांनी अशा प्रकारे हप्ते चुकवेगिरी करणाऱ्यांच्या गाड्या उचलल्यानंतर त्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करावी, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी केले आहे.
ठाणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यंतरी सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढीस लागले होते. ते बºयाच प्रमाणात आटोक्यात येत आणताना दुसरीकडे वाहनचोरीचे प्रकार वाढीस लागले आहेत. वाहन खरेदी केल्यावर पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने बरेच जण ते सार्वजनिक रस्त्यांवर उभे करतात. ते करताना चालक ांकडून त्या वाहनाच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीच काळजी घेत नाही. त्यातच, दुश्मनीतून तसेच खोडसाळपणाने वाहने चोरून ती अज्ञातस्थळी अशी लांब नेतात आणि त्यातील पेट्रोल संपल्यावर ती गाडी बेवारस म्हणून तेथेच सोडून देतात. त्याचबरोबर हप्त्यावर वाहन घेतल्यावर त्याच्या हप्त्यांची चुकवेगिरी केल्यावर इन्शुरन्स कंपन्यांचे लोक हप्ते चुकवणाºयांमागे लागतात. त्यानंतर, ते वाहन कोणालाही काही माहिती न देता उचलून नेतात. अशा प्रकारे मागील महिन्यात कळवा पोलीस ठाण्यात दोन दुचाकी वाहने इन्शुरन्स कंपन्यांनी उचलून नेल्याची बाब त्या वाहनांचा तपास करताना पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. तत्पूर्वी अशा एका इन्शुरन्स कंपनीने तैनात केलेल्या लोकांनी हप्ते चुकवणाºयाचा पाठलाग सुरू केला होता. त्यावेळी अपघातही झाला होता. याप्रकरणी त्या लोकांवर कारवाई केली होती. कळवा पोलिसात दाखल झालेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यातील एक चारचाकी वाहन खालापूर टोलनाका येथे अवस्थेत मिळून आले होते. तर, विटावा गेट येथून आणखी चारचाकी चोरीला गेली होती. ती कोणीतरी खोडसाळपणे त्याच परिसरातील एका पडक्या घरात पार्क करून ठेवल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
>चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासात इन्शुरन्स कंपन्यांनी कळव्यातून दोन दुचाकी उचलून नेल्याचे समोर आले. पण, त्या इन्शुरन्स कंपन्यांनी त्याची पोलीस ठाण्यात माहिती न दिल्याने गुन्हा दाखल करावा लागला. हे प्रकार टाळण्यासाठी अशा कंपन्यांनी वाहन उचलताना त्याची नोंद पोलीस ठाण्यात करावी.
- शेखर बगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
कळवा पोलीस ठाणे