चोरीचे मोबाइल सांभाळण्याची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 01:51 AM2018-03-26T01:51:30+5:302018-03-26T01:51:30+5:30
मोबाइलचोरीची सुसाट लोकल गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत आहे. त्यातच, लोहमार्ग पोलिसांनी या घटनांना आळा
पंकज रोडेकर
ठाणे : मोबाइलचोरीची सुसाट लोकल गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत आहे. त्यातच, लोहमार्ग पोलिसांनी या घटनांना आळा बसवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातूनच, पोलीस तपासात स्मार्ट फोनपूर्वीचे हस्तगत केलेले जुने मोबाइल सांभाळणे आता एक नवी जबाबदारी पोलिसांच्या अंगावर येऊन पडली आहे. कारण, ते घेण्यासाठी तक्रारदार येत नसल्याचे समोर आले आहे. तसेच हा इलेक्ट्रॉनिक कचरा नष्ट करण्यासाठी कोणतेही आदेश नसल्याने ती डोकेदुखीच ठाण्यासह इतरही रेल्वे पोलिसांना होऊन बसल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दररोज चार ते पाच मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. जून २०१७ पासून लोहमार्ग पोलीस ठाण्यात मोबाइलचोरीबाबत ‘एफआयआर’ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच, मागील वर्षभरात ३००२ मोबाइलचोरीची नोंद झाली आहे. इतर गुन्ह्यांपेक्षा मोबाइलचोरीच्या या वाढत्या घटना लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी पेट्रोलिंगवर भर दिला. साध्या वेशातील पोलीस फलाटांवर तैनात केले. एवढेच नाहीतर रेकॉर्डवरील मोबाइलचोरट्यांची ‘टॉप २५’ ही यादी अद्ययावतही केली आहे. त्यामुळे या चोरीच्या घटना मध्यंतरी कमी झाल्या होत्या. पण, पुन्हा त्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. तसेच दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासात चोरट्यांना पकडल्यावर त्यांच्याकडून मोबाइल हस्तगतही केले जात आहेत. पण, हस्तगत होणाऱ्या मोबाइलमध्ये (अॅण्ड्राइड) स्मार्ट फोन असेल, तर तक्रारदार येऊन मोबाइल घेऊन जातात. पण, अॅण्ड्राइडपूर्वीचे मोबाइल घेण्यासाठी कोणी येत नाही. त्यामुळे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात जवळपास २०० जुने मोबाइल आहेत. तसेच ते नष्ट करण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. यामुळे ते नष्टही करता येत नाही. त्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे हे जुने मोबाइल सुरक्षेसह एका बॉक्समध्ये ठेवल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.