लॉकडाऊनमुळे बिघडले 225 मनोरुग्णांचे आरोग्य, उपचारासाठी पुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 01:40 AM2021-01-31T01:40:45+5:302021-01-31T01:42:12+5:30

Thane News : गतवर्षी मनोरुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडलेले आणि दर महिन्याला उपचारासाठी येत असलेल्या त्या २२५ जुन्या मनोरुग्णांच्या उपचारात लॉकडाऊनमुळे खंड पडल्याने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा दाखल केले आहे

Health of 225 psychiatric patients affected by lockdown, re-admitted for treatment | लॉकडाऊनमुळे बिघडले 225 मनोरुग्णांचे आरोग्य, उपचारासाठी पुन्हा दाखल

लॉकडाऊनमुळे बिघडले 225 मनोरुग्णांचे आरोग्य, उपचारासाठी पुन्हा दाखल

Next

ठाणे : गतवर्षी मनोरुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडलेले आणि दर महिन्याला उपचारासाठी येत असलेल्या त्या २२५ जुन्या मनोरुग्णांच्या उपचारात लॉकडाऊनमुळे खंड पडल्याने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा दाखल केले आहे, तर लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट कोसळल्याने नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या २५ नवीन रुग्ण मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत आहे.

लॉकडाऊनचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर झाला आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे झालेल्या मनोरुग्णांना दर महिन्याला दैनंदिन तपासणीसाठी बोलविले जाते. लॉकडाऊनमध्ये वाहने बंद असल्याने या बरे झालेल्या मनोरुग्णांना तपासणीसाठी येत आले नाही. अनलॉक-१ सुरू झाले आणि २२५ जुन्या मनोरुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागले. त्यांच्या उपचारात खंड पडला आणि त्यांचा आजार पुन्हा बळावला. त्यामुळे २२५ मनोरुग्णांना पुन्हा उपचारासाठी दाखल करावे लागले, असे मनोरुग्णल्याचे अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांनी सांगितले. यात १२० पुरुष, तर १०५ महिला असून आतापर्यंत ९७७ मनोरुग्ण उपचार घेत आहेत.

लॉकडाऊन आधी ७००च्या आसपास मनोरुग्ण उपचार घेत होते. लॉकडाऊन काळात बेरोजगारी वाढली, त्यामुळे नैराश्य आले, चिडचिड, अतिराग, आत्महत्येचा विचार मनात येऊ लागले त्यामुळे अशा रुग्णांमध्येदेखील वाढ झाली. २५ नवीन रुग्ण बाह्यविभागात उपचारासाठी येत आहेत. नवीन वाढलेल्या त्या २५ मनोरुग्णांचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच, त्यांना औषधोपचारदेखील दिले जात असल्याचे डॉ. बोदाडे म्हणाले.

मनोरुग्णांसाठी ठामपाने पुढाकार घेण्याची गरज
कोविडमुक्त रुग्णांसाठी ठाणे महापालिकेने पोस्ट कोविड सेंटर सुरू करून उपचार देणे सुरू केले आहे. यामुळे कोरोनामुक्त होऊनही केवळ लाॅकडाऊनमुळे पुन्हा ॲडमिट झालेल्या मनोरुग्णांना ठाणे महापालिकेने आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन मनोरुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून या रुग्णांना ठाणे महापालिकेने आधार द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Health of 225 psychiatric patients affected by lockdown, re-admitted for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.