आरोग्य विभागाची बेफिकीरी, १६ महिन्याच्या बाळाचा मृत्यू?; कुटुंबाचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 07:10 AM2022-02-16T07:10:46+5:302022-02-16T07:11:06+5:30
मृत्यू झालेल्या सर्वेश अशोक धोडी याला १० फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशाळा येथील नर्सने घरी जाऊन या बाळाला एमआर व ट्रिपल बूस्टर डोस दिला होता
मोखाडा : तालुक्यातील कोशिमशेत या गावात एका १६ महिन्यांच्या मुलाला एमआर व ट्रिपल बूस्टर डोस दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या बेफिकीरीमुळे मुलाचा मृत्यू झाला असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
मृत्यू झालेल्या सर्वेश अशोक धोडी याला १० फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशाळा येथील नर्सने घरी जाऊन या बाळाला एमआर व ट्रिपल बूस्टर डोस दिला होता. पण सर्वेशला ९ फेब्रुवारी रोजी १६ महिने पूर्ण झाले असल्याने उशिराने डोस द्या, असे आपण नर्सला सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही, असा आरोप सर्वेशच्या आई मंगला यांनी केला आहे.
हा डोस दिल्यानंतर थोड्या वेळातच सर्वेशला ताप आला, पण डोस दिल्याने ताप आला असावा, असे वाटल्याने त्याच्या आईने नर्सने दिलेले औषध त्याला दिले. पण तरीही त्याला बरे न वाटल्याने १२ तारखेला त्याचे कुटुंबीय त्याला खोडाळा येथील खासगी दवाखान्यात घेऊन गेले. ताप खूप असल्याने बाळाला आकडी येत असल्याने खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत, असाही आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरोग्य विभागातर्फेही या प्रकरणी चौकशी करत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी दिली आहे.