उल्हासनगरात आरोग्य विभागाचे धिंडवडे, १०८ ऍम्ब्युलन्स अभावी एकाने सोडला प्राण, सर्वत्र संताप
By सदानंद नाईक | Updated: January 24, 2025 18:10 IST2025-01-24T18:10:32+5:302025-01-24T18:10:53+5:30
मध्यवर्ती रुग्णालयातील प्रकार

उल्हासनगरात आरोग्य विभागाचे धिंडवडे, १०८ ऍम्ब्युलन्स अभावी एकाने सोडला प्राण, सर्वत्र संताप
सदानंद नाईक
उल्हासनगर : अत्यवस्थ रुग्णाला घेण्यासाठी १०८ नंबरची ऍम्ब्युलन्स आली नसल्याने, रुग्णांने मध्यवर्ती रुग्णालयात गुरुवारी रात्री प्राण सोडला. याप्रकाराने आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी बिव्हीजी-एमईएमएस च्या व्यवस्थापकला पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. तर मृत रुग्णालयाच्या नातेवाईकांनी ऐकूनच आरोग्य व्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला.
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील राहुल इंदाले या ३५ वर्षीय इसमाची तब्येत बिघडल्याने, मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी दुपारी ३ वाजता राहुल यांची तब्येत बिघडल्यावर पुढील उपचार करण्यासाठी नेण्यासाठी १०८ नंबरच्या ऍम्ब्युलन्सला फोन केला. मात्र दोन तास ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार नाही, असे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. या दरम्यान रुग्णाची तब्येत बिघडत होती. या ऍम्ब्युलन्स मध्ये अद्यावत सुविधा व ऐक डॉक्टर रुग्णासोबत असतो. तशी सुविधा मध्यवर्ती रुग्णालयाच्या ऍम्ब्युलन्स मध्ये नाही. नातेवाईकानी खाजगी ऍम्ब्युलन्स बोलाविण्याची विनंती डॉक्टर व नर्सला केली. तसेच १०८ नंबरची ऍम्ब्युलन्स येत नोव्हती.
मध्यवर्ती रुग्णालयात चाललेला गोंधळ, चिंतातूर नातेवाईक व येत नसलेली १०८ नंबरच्या ऍम्ब्युलन्समुळे सायंकाळी साडे सात वाजता राहुल इंदाले यांनी प्राण सोडला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश करून रुग्णालय डॉक्टर, नर्स व १०८च्या ऍम्ब्युलन्समुळे राहुल यांचा जीव गेल्याचा आरोप केला. समाजसेवक शिवाजी रगडे यांनी आरोग्य सुविधामुळे व १०८ नंबरची रुग्णवाहिका वेळेत आली नसल्याने, एका इसमचा मृत्यू झाल्याचे सांगून, संबंधितवार कारवाई करण्याची मागणी रुग्णालय जिल्हा चिकित्सक यांच्याकडे केली.
१०८ ऍम्ब्युलन्सची तक्रार, डॉक्टरला नोटीस
१०८ ऍम्ब्युलन्सला फोन करूनही ती आली नसल्याने, मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी १०८ नंबर ऍम्ब्युलन्सचे सेवा देणाऱ्या बिव्हीजी-एमईएमएस कंपनीच्या ठेकेदाराला पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. तसेच सबंधित डॉक्टर व नर्सला कारणेदाखवा नोटीस दिली. १०८ नंबर ऍम्ब्युलन्सची सेवा एका खाजगी संस्थेकडून दिली जाते. राज्याच्या आरोग्य विभागाने त्या संस्थेला ठेका दिल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. रुग्णालयाच्या ऍम्ब्युलन्स मध्ये या सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.