आरोग्यमंत्र्यांनी प्रवक्ते नरेश म्हस्केंचा मेंदू तपासावा, राष्ट्रवादीकडून पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 07:35 PM2022-09-08T19:35:13+5:302022-09-08T19:47:11+5:30
नरेश म्हस्के हे शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत, ते फुटीर एकनाथ शिंदे गटाचे ते प्रवक्ते असू शकतात.
मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे, विरोधी पक्षातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सत्ताधारी पक्षावर टिका करण्यात येते. या टिकेला शिंदेगटाकडूनही प्रत्युत्तर दिलं जातं. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी महापौर नरेश म्हस्के हेही ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे, ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी म्हस्के यांच्यावर टिका करत, त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचं म्हटलं आहे. तसेच, आरोग्यमंत्र्यांनी त्यांचा मेंदू तपासून घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नरेश म्हस्के हे शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत, ते फुटीर एकनाथ शिंदे गटाचे ते प्रवक्ते असू शकतात. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नरेश मस्के ट्विटरवरुन करत आहेत नरेश म्हस्के यांच्या वयापेक्षा जास्त संसदीय प्रवास हा शरद पवार यांचा आहे. तर, अजित पवार हे सकाळी ७ वाजल्यापासून मंत्रालयात कामासाठी हजर असतात आणि संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्यावर म्हस्के टीका करीत आहेत. म्हणून मला म्हस्के यांची कीव येतो, म्हस्के राहातात तिथेच मेंटल हॉस्पीटल आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना विनंती करतो की, या हॉस्पीटलमध्ये एका व्हीआयपी रुमची व्यवस्था करुन फुटीर गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना दाखल करावे. तेथे त्यांच्या मेंदूची चाचणी करावी, अशी मागणी मी आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहे, बहुतेक त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, अशा शब्दात आनंद परांजपे यांनी शिंदेगटाच्या प्रवक्त्यांवर तोफ डागली आहे.
काय म्हणाले होते म्हस्के
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली होती त्यामुळे, नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळेंवर टिका केली. ताई, आतापर्यंत आमच्या सरकारने 1348 फाईल्स क्लियर केल्यात. लोकहिताचे दररोज सरासरी ३ ते चार निर्णय घेतले जात आहेत, कधी वेळ मिळाला तर मोजणी करून घ्या, असेही म्हस्के यांनी म्हटले. त्यामुळे, आनंद परांजपे यांनी या टिकेचा समाचार घेतला आहे.
शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी निवड
शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर नरेश म्हस्के यांची पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, म्हस्के यांची या पदावरून हकालपट्टी करत असल्याचे ‘सामना’ दैनिकातून जाहीर करण्यात आले. मात्र, ही हकालपट्टी बेकायदेशीर ठरवून एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे.