सार्वजनिक शौचालयामुळे आरोग्यास धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:48 PM2018-12-13T22:48:10+5:302018-12-13T22:48:57+5:30
शहरातील सोनार आळी येथील सार्वजनिक शौचालय पुर्णत: मोडकळीस आलेले असल्याने तसेच शौचालयाला सेफ्टी टॅँकसुध्दा नसल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरते.
जव्हार : शहरातील सोनार आळी येथील सार्वजनिक शौचालय पुर्णत: मोडकळीस आलेले असल्याने तसेच शौचालयाला सेफ्टी टॅँकसुध्दा नसल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरते. म्हणून मंगळवारी नागरीकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुमना पंत यांना लेखी तक्रार करुन शौचालय तोडण्याची मागणी केली आहे. तक्रारीची एक प्रत स्थानिक नगरसेवक कुणाल उदावंत यांनाही देण्यात आली होती. त्यांनीही तात्काळ कारवाई करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
या शौचालयाचा मैला गटारात सोडण्यात येत असल्याने परिसरात नेहमी उग्र वास येतो. त्यातच डूक्कर व कुत्रे स्वैरपणे फिरत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, याबाबत वारंवार प्रसिध्दी माध्यमांद्वारे बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र याची दखल नगर परिषद प्रशासनाकडून न घेतल्याने नाराजी व्यक्त होत होती. या कारणामुळे परिसरातील नागरिकांनी आम्ही कर भरत असून आम्हाला दुर्गंधीच्या वातावरणात रहावे लागत असल्याची तक्रार केली होती. तसेच, शौचालयाच्या बाहेर मोकळी जागा असुन परीसरातील रहीवाशी तेथे कचरा टाकत आहेत.
परिषदेची घंटागाडी नियमित येऊन घरोघरून कचरा उचलून जाते मात्र, सोनार आळीतील काही बेजबाबदार कुटुंब उघड्यावर कचरा टाकत आहेत. तसेच मुख्य रस्त्या शेजारची गटारे काही ठिकाणी उघडी असल्याने अपघाताचा धोका वाढतो. एकाच वेळी दोन वाहने समोरासमोर आल्याच पेच वाढत असल्याने नगर परिषदेने ती झाकावी अशी मागणी केली जात आहे. तसेच शौचालयाच्या शेजारी छोटीसी गल्ली आहे मात्र, त्यातही शौचालयाचे बांधकाम करून प्रशासनानेच अतिक्रमण केलेले आहे.
शहराला स्वच्छतेचे प्रमाणपत्र मिळाले असून लाखो रुपए निधी मिळालेला आहे मात्र, सोनार आळीतील सेफ्टी टाकी नसलेल्या हा सार्वजनिक शौचालयाचा वापर कसा काय होतो असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या शौचालयाचा वापर कुणीही करीत नसल्याने तो तात्काळ जमीनदोस्त करण्याची सामूहीक मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सदर बाब ही आरोग्यास धोकादायक असून गंभीर आहे, त्यामुळे मी तात्काळ मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देऊन तात्काळ कारवाई करण्याबाबत सुचना केल्या आहेत अशी माहिती नगरसेवक कुणाल उदावंत यांनी लोकमतला दिली.