भिवंडीतील आरोग्य सेवा सुधारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:49 AM2021-09-07T04:49:24+5:302021-09-07T04:49:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त यांची मुंबई येथील आरोग्य ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त यांची मुंबई येथील आरोग्य भवन येथे सोमवारी भेट घेतली. यावेळी भिवंडीतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी राज्य आरोग्य सेवा यंत्रणेने प्रयत्न करावेत, तसेच शहरातील एकमेव स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयास २०० खाटांचे जिल्हा दर्जाचे रुग्णालयाच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, मनपा क्षेत्रात जास्त आरोग्य सुविधा द्याव्यात या मागण्या आरोग्य सेवाआयुक्तांकडे केल्या.
आमदार रईस शेख यांनी राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त यांच्याकडे इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयास २०० खाटांचे जिल्हा दर्जाचे रुग्णालयाच्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत भिवंडी शहरामध्ये २०० खाटांचे माता संगोपन व बाल आरोग्य केंद्र उभारावे, भिवंडीत कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षणविषयक निरनिराळे डिप्लोमा कोर्सेस सुरू करावेत, महानगरपालिका क्षेत्रामधील स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयामध्ये युनानी बाह्यरुग्ण विभाग सुरू करावे, १०८ क्रमांकाची शासकीय रुग्णवाहिका सेवा ठाणेपर्यंतच मर्यादित न ठेवता मुंबई शहरापर्यंत सुरू करण्यात यावी, स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय येथे जेनेरिक मेडिकल स्टोअर्स सुरू करावे , शहरात मोबाईल मेडिकल युनिट उपलब्ध करावे, शांतीनगर व नवी वस्ती येथे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयमध्ये शासकीय व्यसनमुक्ती केंद्र व शववाहिनी विनामूल्य उपलब्ध करण्यात यावी, इमारत दुरुस्ती व विस्तारीकरणासाठी १० करोड निधीची तरतूद करावी, या व अशा अनेक मागण्या आमदार शेख यांनी या बैठकीप्रसंगी केल्या. शक्य तितक्या सुविधा रुग्णालयात तत्काळ सुरू करण्यात येतील, असे आश्वासन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामा स्वामी व संचालिका डॉ. साधना तायडे यांनी दिल्याची माहिती रईस शेख यांनी दिली आहे.
यावेळी उपसंचालक डॉ. अंबाडेकर, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेश मोरे व मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. खरात हे उपस्थित होते.