आरोग्यसेविका कोरोना लस घेण्यात आघाडीवर, पुरुष कर्मचारी मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:49 AM2021-02-10T01:49:18+5:302021-02-10T01:49:31+5:30
कोरोना लसीकरणाचे ८७ टक्के काम पूर्ण
- हितेन नाईक
पालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५ हजार ६०० टार्गेटपैकी ४ हजार ८२७ लसी देण्यात आल्या असून ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, लस घेण्यात महिला आरोग्यसेविका आघाडीवर असून त्यांचे ६० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ८२७ जणांचे कोरोना लसीकरण झाले असून राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्हा तीन नंबरवर आहे. कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळापासून पालघर जिल्ह्यातील जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, डॉ. केळकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, डॉ. सागर पाटील, डॉ. मिलिंद चव्हाण आदी अधिकाऱ्यांनी नियोजनात्मकरीत्या काम सुरू करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. सध्या पालघर जिल्हा एक ते तीन क्रमांकाच्या आत असून आरोग्य विभागाने दिलेले टार्गेट पूर्ण करण्याच्या दिशेने आशादायक वाटचाल सुरू आहे.
जिल्ह्यात लसीकरणामध्ये आरोग्यसेवेतील नर्स आणि सिस्टर आदी महिलांचे प्रमाण जास्त असून त्याचे प्रमाण ६० टक्के आहे. यामुळे लस घेण्यामध्ये पुरुष आरोग्यसेवकांपेक्षा महिला आरोग्यसेवक पुढे असल्याचे उघड झाले आहे.
सध्या जिल्ह्यात लसीकरणाचे समाधानकारकरीत्या काम सुरू आहे. लसीकरणाबाबत कुठूनही नकार नाही. लसीकरणादरम्यान ताप येणे अशा किरकोळ इन्फेक्शनव्यतिरिक्त कुठलीही बाधा झालेली नाही.
- डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी