अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:51 AM2021-05-07T00:51:28+5:302021-05-07T00:51:49+5:30

सर्वाधिक महानगरपालिकांचे शहर म्हणून ठाणे जिल्ह्याची देशपातळीवर ओळख आहे. या जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा आणि या शहरांना लागून असलेल्या ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबईत कार्यरत असलेल्यांच्या निवासस्थानांचा भार सांभाळत आहे.

Health workers lag behind doctors in officer-staff vaccinations | अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी पिछाडीवर

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी पिछाडीवर

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी या पहिल्या फळीतील म्हणजे फ्रंटलाइन वर्कर्सच्या तुलनेत हेल्थ वर्कर्स म्हणजे आरोग्य यंत्रणेचे स्वतः डॉक्टर, परिचारिका कोरोना लसीकरणात मागे पडल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे. आतापर्यंत त्यांचे पहिल्या डोसचे ९० टक्के व दुसऱ्या डोसचे फक्त ५८ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे यादरम्यान काही डॉक्टरांसह  कर्मचारी कोरोनाच्या या चक्रव्यूहात  अडकले.

सर्वाधिक महानगरपालिकांचे शहर म्हणून ठाणे जिल्ह्याची देशपातळीवर ओळख आहे. या जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा आणि या शहरांना लागून असलेल्या ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबईत कार्यरत असलेल्यांच्या निवासस्थानांचा भार सांभाळत आहे. दाटीवाटीने राहत असलेल्या रहिवाशांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, जिल्ह्यातील एक लाख दोन हजार ३३७ फ्रंटलाइन वर्कर्स, डॉक्टरांपैकी आतापर्यंत फक्त ९१ हजार ९८९ (९० टक्के) जणांनी पहिला डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी ५८ टक्के म्हणजे ५३ हजार ५० डॉक्टरांसह परिचारिका, वाॅर्डबॉय आदींनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. या महामारीत डॉक्टरांसह परिचारिका, आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रारंभापासून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, जिल्ह्याच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर्स, परिचारिका आदींनी लसीकरण करून घेण्याचे गांभीर्याने घेतलेले दिसून येत नाही.

लसीकरण करणे गरजेचे 
जिल्ह्यातील पहिल्या फळीतील  ८९ हजार ९२० या पोलीस यंत्रणेचा लसीकरणाचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण झाला आहे, तर दुसरा डोस ३९ हजार ८४ जणांनी (४७ टक्के) पूर्ण केला आहे. यावरून लसीकरणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी,‌ कर्मचाऱ्यांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रशासनाने यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खासगी व्यवस्थापनाप्रमाणे सक्ती न‌ केल्यामुळे आरोग्य व पोलीस यंत्रणेचे आतापर्यंत १०० टक्के लसीकरण झाले नसल्याचे दिसून येत आहे.

मुरबाडकरांच्या कोरोना लसीवर 
ठाणे, मुंबईकरांनी मारला डल्ला

मुरबाड : मागील कित्येक दिवस तालुक्यातील लसींवर शेजारच्या तालुक्यांबरोबर ठाणे, मुंबईकरांनीही डल्ला मारल्याने मुरबाडकरांना लस कमी पडली आहे. आता १८ वर्षांपासून सर्वांना लस दिली जाणार असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक हे वंचित राहत असल्याने काँग्रेसचे चेतनसिंह पवार, शिवसेनेचे राम दुधाळे व मनसेचे नरेश देसले हे आक्रमक झाले असून त्यांनी तहसीलदार व पोलिसांना शिवनेरी विश्रामगृहावर धारेवर धरत संताप व्यक्त केला.

टोकावडे परिसरातील आदिवासी वाड्यावस्त्यांमधील नागरिकांमध्ये लस घेण्याविषयी संभ्रम व निरुत्साह असल्याने लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. त्याचबरोबर मुरबाड तालुक्यातील ४५ वर्षांपुढील नागरिकांमधील मोबाइल निरक्षरता, वीज व इंटरनेटच्या लपंडावामुळे कित्येकांना लस घेण्यापासून वंचित राहावे लागले आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर कुठेही लस मिळत असल्याने मुंबईकरांनी व शेजारच्या तालुक्यांतील नागरिकांनी मुरबाडमध्ये लस घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांतील ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांची संख्या आशा कार्यकर्त्यांच्या सर्व्हेनुसार निश्चित असतानाही लसीचा तुटवडा आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे लाभार्थी व लक्षांश याबाबत योग्य नियोजन नसल्याने तालुक्यातील नागरिकांना लस कमी पडत आहे. वाढत्या कोरोनाकाळातही नागरिकांना लसीकरणासाठी ताटकळत बसावे लागत आहे. प्रत्येक केंद्रांवर सामाजिक अंतराचा फज्जा तर उडत आहेच, शिवाय कोरोनाची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या ऑनलाइन नोंदणी झाल्याशिवाय लस मिळणार नाही, असे आरोग्य अधिकारी सांगत असले, तरी कोणत्या संकेतस्थळावर, ॲपवरून नोंदणी करायची आहे, याचे मार्गदर्शन नसल्याने मुरबाडकर लसीपासून वंचित आहेत.तालुक्यातील कोणत्याच केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद होते. लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वप्रथम तालुकाबाह्य व प्राथमिक आरोग्य केंद्रांव्यतिरिक्त नागरिकांना लस देण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी मुरबाडकर करीत आहेत.
 

Web Title: Health workers lag behind doctors in officer-staff vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.