दहिवलीत आरोग्य यंत्रणा सज्ज; डेंग्यूने दोन महिलांचा मृत्यू, जिल्हा आरोग्य अधिका-यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:39 AM2017-11-12T04:39:41+5:302017-11-12T04:39:46+5:30
डेंग्यूसदृश आजाराने दोन महिलांचा मृत्यू’ या शीर्षकाखाली शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शहापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी दहिवली गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
आसनगाव : ‘डेंग्यूसदृश आजाराने दोन महिलांचा मृत्यू’ या शीर्षकाखाली शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शहापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी दहिवली गावाला
भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या गावात दोन दिवसांत डेंग्यूसदृश आजाराने संजीवनी पाटील (३०), मंदाबाई पाटील (४५) या दोन महिलांचा अचानक मृत्यू झाला.
याच परिसरात राहणारा कैलास शिंगळे यास डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दोन्ही महिलांची डेंग्यूची चाचणी केली असता तो नसल्याचा अहवाल मिळाला होता. मात्र, डेंग्यूसदृश लक्षणामुळे चांगल्या रुग्णालयात उपचार करूनही उपचारास प्रतिसाद न देता महिलांचा मृत्यू झाला.
डॉक्टर व आरोग्य यंत्रणेस मृत्यूचे निश्चित कारण कळत नव्हते. या कारणाने आरोग्य यंत्रणा गोंधळलेली होती. शनिवारी आरोग्य पथकाने येथे तत्काळ हजेरी लावत योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेंद्रूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेंद्रूणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली शेडगे यांनी मार्गदर्शन केले. तर, आरोग्य पर्यवेक्षक एस.डी. पगार यांनी घरांना भेटी देऊन जनजागृती केली.
दहिवली गाव व परिसरातील ग्रामस्थांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी धूरफवारणीची विनंती करण्यात आली आहे.
- डॉ. बाळासाहेब सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी
दहिवली उपकेंद्रात २४ तास आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. ताप, मलेरिया, टाइफॉइड रु ग्णांची शोध मोहीम हाती घेतली आहे. मृत महिलांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांकडून मृत्यूची कारणमीमांसा केली.
- डॉ. महेश नगरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी