माजी नगरसेविका मयेकर यांच्या जातप्रमाणपत्रावर सुनावणी
By admin | Published: January 20, 2016 01:51 AM2016-01-20T01:51:04+5:302016-01-20T01:51:04+5:30
भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका सरस्वती रजनीकांत मयेकर यांनी खोटे जातप्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश देणाऱ्या
भार्इंदर : भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका सरस्वती रजनीकांत मयेकर यांनी खोटे जातप्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश देणाऱ्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने येत्या ५ फेब्रुवारी रोजी फेरसुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. समितीच्या निर्णयाविरुद्ध मयेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अलीकडेच समितीस फेरसुनावणी घेण्याचे आदेश दिले.
आॅगस्ट २०१२ मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ४ मधून सरस्वती मयेकर भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या. तेथील उमेदवारीसाठी त्यांनी इतर मागासवर्गातील मच्छीमार दालदी या जातीचे प्रमाणपत्र कोकण विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केले होते. समितीने त्यांचे जातप्रमाणपत्र वैध ठरवत त्यांना १२ जुलै २०१२ रोजी वैधता प्रमाणपत्र दिले. जातपडताळणीवेळी मयेकर यांनी मुसलमान सुुन्नी जातीचा उल्लेख असलेल्या वडिलांच्या शाळेचा दाखला सादर केला होता. विवाहापूर्वी मयेकर या मुस्लिम समाजाच्या होत्या. त्या वेळी त्यांचे नाव फरजाना अलिमिया शेगले, असे होते. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मच्छीमार दालदी या जातीनुसार मयेकर यांनी आपल्या वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय उमेदवारी अर्जात नमूद केल्याने राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार नर्मदा वैती यांनी त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात २०१२ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर १४ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सदर चौकशी कोकण विभागीय जातप्रमाणपत्र समितीपुढे घेण्याचे निर्देश दिले होते. समितीने केलेल्या चौकशीत मयेकर यांनी सादर केलेल्या वडिलांच्या दाखल्यात नमूद केलेली जात मुसलमान सुन्नी असतानाही उमेदवारी अर्जात मच्छीमार दालदी ही इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जात नमूद केली. त्यामुळे खोटी माहिती दिल्याचे सांगत जात प्रमाणपत्र रद्द ठरविले होते. (प्रतिनिधी)