राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा महिलांच्या तक्रारींची ठाण्यात प्रत्यक्ष घेणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 01:52 PM2017-10-10T13:52:36+5:302017-10-10T13:53:06+5:30
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते किंवा नाही हे स्वत: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर पहात असून गुरुवार १२ तारखेस त्या कोकण विभागातील तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.
ठाणे- कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते किंवा नाही हे स्वत: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर पहात असून गुरुवार १२ तारखेस त्या कोकण विभागातील तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि कोकण विभागीय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयातील अंतर्गत महिला तक्रार निवारण समित्यांसाठी (ICC) विभागीय स्तरावरील कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेचे उदघाटन १२ तारखेस डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी १० वा होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ यांनी दिली
सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
महिलांना न्याय मिळावा यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या संकल्पने अंतर्गत ठाणे, रायगड,पालघर, नवी मुंबईतील महिलांच्या नव्याने येणाऱ्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येणार आहे. सुनावणी, तक्रारीसाठी मुंबई कार्यालयात येणं शक्य नसलेल्या महिलांना याचा फायदा होणार आहे.