बनावट बांधकाम परवानगी मिळवण्याबाबतची याचिका सुनावणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:39 AM2021-03-25T04:39:24+5:302021-03-25T04:39:24+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत एका प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि सही, शिक्क्यांच्या आधारे बांधकाम परवानगी प्राप्त करून महारेरा प्रमाणपत्र ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत एका प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि सही, शिक्क्यांच्या आधारे बांधकाम परवानगी प्राप्त करून महारेरा प्रमाणपत्र मिळविल्याबाबत कल्याणचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने संबंधितांना नोटिसा बजावण्यात याव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार आहे.
पाटील यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिका हद्दीत एका बांधकामाला बनावट कागदपत्रे आणि महापालिकेचे खोटे सही-शिक्के वापरून रेराचे प्रमाणपत्र मिळवल्याची बाब माहिती अधिकारात उघडकीस आली होती. सर्वसामान्यांची या प्रकल्पाच्या घरखरेदीतील फसवणूक थांबविण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पाटील यांच्या वतीने वकील प्रसाद भुजबळ यांनी बाजू मांडली. यावेळी राज्य सरकारचे वकील आणि डिस्ट्रीक्ट रजिस्ट्रार सुनावणीस उपस्थित होते. न्यायालयाने या प्रकरणात संबंधितांना नोटिसा काढण्याचे आदेश दिले. अशा प्रकारची बेकायदा कामे रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय हवा, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. रेराचा प्रमुख उद्देश हा सामान्यांची घरखरेदीतील फसवणूक थांबविणे हा आहे. त्याच उद्देशाला या प्रकरणात हरताळ फासला गेल्याकडे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मंगळवारी सुनावणी होईल, असे न्यायमूर्ती एस.पी. देखमुख आणि न्या. जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
........
वाचली
---------------