ट्रिपल तलाकप्रकरणी अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:30 AM2019-08-05T03:30:14+5:302019-08-05T06:52:37+5:30
ट्रिपल तलाक कायद्यानुसार देशातील पहिला गुन्हा मुंब्य्रात दाखल
ठाणे : ट्रिपल (तिहेरी) तलाक कायदा लागू झाल्यानंतर दाखल झालेल्या देशातील पहिल्या गुन्ह्यामध्ये आरोपीने सादर केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी ठाणे जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
ट्रिपल तलाक कायद्यानुसार शुक्रवारी देशातील पहिला गुन्हा मुंब्य्रातील जन्नत बेगम इम्तियाज पटेल (३३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आला. तिला व्हॉट्स अॅपवरून तलाक देणारा पती इम्तियाज पटेल याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल
झाला आहे.
या प्रकरणी इम्तियाज याने शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. त्या अर्जावर होणाऱ्या सुनावणीसाठी या नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयाकडे वेळ मागून घेतला. त्यामुळे न्यायालयाने सोमवारी सुनावणी ठेवली असून, तो गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे, हेही या वेळी स्पष्ट होईल.