पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप; १७ हजार मूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:57 AM2020-08-27T00:57:36+5:302020-08-27T00:57:52+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कायम आहे. सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या केलेल्या विनंतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
ठाणे : ठाण्यात पाच दिवसांच्या १६ हजार ८१५ गणेशमूर्तींचे बुधवारी नियम पाळत विसर्जन करण्यात आले. यामध्ये १६ हजार ७३७ घरगुती आणि ७८ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश होता. शहरांतील विसर्जन घाट कृत्रिम तलावात शांतपद्धतीने गणरायाला निरोप दिला गेला. तर अनेकांनी गणेशमूर्तींचे आपापल्या घरातच विसर्जन केले. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलाव परिसरातही काहीसा शुकशुकाट होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कायम आहे. सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या केलेल्या विनंतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना दरवर्षीपेक्षा कमी झाली असली तरी ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात सुमारे एक हजार सार्वजनिक तर सुमारे दीड लाख घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. रविवारी २६७ सार्वजनिक आणि सुमारे ४० हजार दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे जिल्ह्याच विसर्जन झाले. तर बुधवारी पाच दिवसांच्या १६ हजार ८१५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बुधवारी ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा शहरात ३५ सार्वजनिक आणि ४ हजार ४३५ घरगुती, भिवंडीत ९ सार्वजनिक २२९ घरगुती, कडोंमपात २१ सार्वजनिक, ६५१० घरगुती, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये १३ सार्वजनिक तर ५ हजार ३७२ घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले. अनेकांनी घरगुती गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन केले.
ना ढोलताशे, ना गर्दी
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विसर्जन घाट आणि कृत्रिम तलाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. अत्यंत साधेपणाने मास्क बांधून तीन ते चार भाविक विसर्जन घाटावर येत होते. ढोलताशे किंवा ध्वनिक्षेपक नसल्याने प्रदूषणही झाले नाही. गर्दी नसल्याने पोलिसांच्या बंदोबस्ताचा ताणही काहीसा हलका झाला होता.