पारा गेला चाळिशीपार! ठाणे ४३ अंशांवर, वाढत्या उकाड्याने ठाणेकरांची लाहीलाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 06:26 AM2023-04-13T06:26:42+5:302023-04-13T06:26:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील तापमानात कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे.
ठाणे/मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील तापमानात कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातही गेले तीन दिवस शहराचे तापमान ४० अंशांपेक्षा अधिक दिसून आले आहे. बुधवारी शहरातील तापमान ४३.३ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. वाढत्या तापमानामुळे एप्रिल महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागले असून या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.
ठाणे जिल्ह्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने बदल झाले. ऐन उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. यानंतर रात्री थंडी आणि दिवसा उष्मा असे वातावरण बदल दिसून आले, असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होऊन शहराचे तापमान चाळीशी पार गेले आहे. शहरात १० एप्रिलला ४२.१ अंश सेल्सियस, तर ११ एप्रिलला ४२.८ अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर बुधवारी म्हणजेच १२ एप्रिलला तापमानात आणखी वाढ झाली असून शहरात ४३.३ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदविले गेले आहे.
सकाळी १० पासूनच चटके
वाढत्या तापमानामुळे शहरात सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत हे वातावरण कायम असते. या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.
यापासून बचाव करण्यासाठी नागरिक छत्री, स्कार्फ, टोपी, गॉगलचा वापर करताना दिसत आहेत. तसेच ताक, उसाचा रस, लिंबू सरबत असे पेय पीत असून यामुळे थंडपेयाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.
मुंबईचा पारा ३६च्या पुढे ; पुढील पाच दिवस पावसाचे
मुंबईकरांना उन्हाचा तडाखा बसत असून, मुंबईचे कमाल तापमान आता ३६ अंशांपार गेले आहे. तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून, पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही भागांना पावसाचा इशारा दिला असून, यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा देण्यात आल्याने अवकाळीचे संकट आणखी गहिरे झाले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांसाठी राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. १४ एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची दाट शक्यता आहे. १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार