उष्णतेच्या लाटेचा धोका; कोणती काळजी घ्यावी? प्रशासनाने सांगितल्या उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 21:52 IST2025-03-11T21:52:21+5:302025-03-11T21:52:45+5:30

मार्च ते मे या कालावधीत ठाणे जिल्ह्यात संभाव्य उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Heat wave threat What precautions should be taken Measures advised by the administration | उष्णतेच्या लाटेचा धोका; कोणती काळजी घ्यावी? प्रशासनाने सांगितल्या उपाययोजना

उष्णतेच्या लाटेचा धोका; कोणती काळजी घ्यावी? प्रशासनाने सांगितल्या उपाययोजना

Weather Update: प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, भारतीय हवामान विभाग यांच्याकडून १३ मार्चपर्यंत ठाणे जिल्ह्यात काही भागात उष्णतेची लाट येण्याबाबत हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मार्च ते मे या कालावधीत ठाणे जिल्ह्यात संभाव्य उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आल्या आहेत.  

उष्णतेची लाट: नागरिकांनी काय करावे व काय करू नये?

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण निर्माण होऊन मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेदरम्यान परिणाम कमी करण्यासाठी आणि उष्मघातामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील उपाय करू शकता.

तहान लागलेली नसली तरीही अधिकाधिक पाणी प्यावे.
हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
बाहेर जातांना गॉगल्स, छत्रो/टोपी, बुट व घपलाचा वापर करावा.
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा.
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गुरांना छावणीत ठेवावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करावे.
पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.
बाहेर कामकाज करीत असताना अधून मधून विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी.
रस्ताच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
जागोजागी पाणपोईची सुविधा करावी.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करू नये
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.
दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांनी केले आहे.
 

Web Title: Heat wave threat What precautions should be taken Measures advised by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.