पक्ष्यांना उष्माघाताचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:10 AM2019-03-02T00:10:05+5:302019-03-02T00:10:12+5:30
सर्वाधिक १४ घारी, आठ ससाण्यांचा समावेश : एसपीसीए संस्थेला त्यांचे जीव वाचवण्यात यश
ठाणे: फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा अचानक काही प्रमाणात पारा वाढल्याने ठाणे, डोंबिवली, मुलुंड आणि घोडबंदर या परिसरांत वावरणाऱ्या दुर्मीळ २४ पक्ष्यांना उष्माघाताचा तडाखा बसला आहे. त्यांना प्राणी व पक्षिमित्रांनी वेळीच ठाण्यातील एसपीसीए या संस्थेत उपचारार्थ दाखल केल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक १४ घारींसह ससाणे आणि बगळे यासारख्या पक्ष्यांचाही समावेश असून त्यातील काही पक्षी लवकरच आकाशी पुन्हा एकदा भरारी घेण्यास तयार झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
आॅक्टोबर आणि मे या महिन्यांत पशुपक्ष्यांना उष्माघाताचा जास्त त्रास होतो. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात वावरणाºया २४ दुर्मीळ पक्ष्यांना उष्माघात झाल्याचे समोर आले आहे. २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान ठाणे एसपीसीए या संस्थेच्या रुग्णालयात या पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत. या जखमींमधील पक्ष्यांमध्ये १४ घारी, आठ ससाणे आणि दोन बगळे असून त्यातील निम्म्या पक्ष्यांना दोन ते चार दिवसांत मुक्तसंचार करण्यासाठी येऊर, कर्नाळा किंवा ज्याज्या परिसरांतून आणले, त्यात्या परिसरांत सोडले जाणार आहे. उर्वरित पक्ष्यांनाही लवकरच सोडण्यात येईल. तसेच अशा पक्ष्यांसाठी सद्य:परिस्थितीनुसार त्यांच्यासाठी खास व्यवस्थाही केली असून तेथे त्यांच्यावर योग्यरीत्या उपचार सुरू असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास राणे यांनी दिली.
विहिरीत पडून कोल्हा जखमी
पाण्याच्या शोधात ऐरोली परिसरात आलेला कोल्हा तेथील एका कोरड्या विहिरीत पडला होता. त्याला वनविभाग आणि अग्निशामक दलाने विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर, सामाजिक संस्था आणि वनविभागाचे अधिकारी रविवारी (२४ फेब्रुवारीला) ठाणे एसपीसीए या संस्थेत उपचारार्थ दाखल केले होते. तपासणीत त्याच्या मानेला दुखापत झाल्याचे समोर आले असून त्याला पुढे वनविभागाच्या रुग्णालयात हलवले आहे. अशा प्रकारे वर्षभरात साधारणत: पाच कोल्ह्यांना उपचारार्थ आणल्याची माहिती डॉ. राणे यांनी दिली.