चिरनेर -दिघाटी दरम्यानच्या सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरच थेट अवजड डंपर कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:26 PM2023-01-10T18:26:33+5:302023-01-10T18:26:39+5:30
चिरनेर -दिघाटी दरम्यानच्या सिडकोच्या हेटवणे धरणाच्या दिड मीटर व्यासाच्या जलवाहिनीवर अवजड डंपर कोसळला आहे.
मधुकर ठाकूर
उरण : चिरनेर -दिघाटी दरम्यानच्या सिडकोच्या हेटवणे धरणाच्या दिड मीटर व्यासाच्या जलवाहिनीवर
अवजड डंपर कोसळला आहे.यामुळे जलवाहिनी फुटल्याने २०० फुट उंचीवर पाणी उसळून लाखो लिटर्स पाणी वाया गेले आहे.जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी (१०) पेण, पनवेल,उलवा, खारघर, द्रोणागिरी परिसरातील पाणीपुरवठा ८ तास बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे अधिक्षक अभियंता प्रतिक मुल यांनी दिली.
पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबई, खारघर,उरण येथील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोची चिरनेर - गव्हाण फाटा रस्त्यालगत सुमारे दिड मिटर व्यासाची पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. चिरनेर -दिघाटी दरम्यानच्या रस्त्यावरुन जाताना मंगळवारी (१०) दुपारी २.१५ ते २.४५ वाजताच्या दरम्यान भरधाव वेगाने जाणारा अवजड डंपर पलटी होऊन कोसळला आहे. अवजड डंपर थेट दिड मीटर व्यासाच्या उच्च दाबाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्ववर कोसळल्याने फुटलेल्या जलवाहिनीमधुन सुमारे २०० फुट उंचीपर्यंत पाण्याचा लोंढा उठला होता.यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया गेले आहे.रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सदर घटनेची माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच पाईप लाईनमधून सुरु असणारा पाणी पुरवठा बंद केला आहे.
दरम्यान जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी ८ तास पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रतिक मुळ यांनी दिली.या हेटवणे धरणाच्या पाणीपुरवठा योजनेतुन पेण, पनवेल,उलवा, खारघर, द्रोणागिरी, नवीमुंबई परिसरात पाणी पुरवठा केला जातो.नवी मुंबई परिसरातील नागरिकांना याआधीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यानंतर पाणी कपातीचे संकट उभे ठाकले आहे.त्यानंतर आता पाणीपुरवठा ८ बंद राहणार असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.