अपंगत्वावर मात करण्याची जिद्द भारी
By admin | Published: May 31, 2017 06:03 AM2017-05-31T06:03:01+5:302017-05-31T06:03:01+5:30
शहरातील के. वि. पेंढरकर महाविद्यालयातील सिद्धार्थ ठोंबरे या विद्यार्थ्याने जिद्दीने अपंगत्वावर मात करून इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेत
जान्हवी मोर्ये / लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील के. वि. पेंढरकर महाविद्यालयातील सिद्धार्थ ठोंबरे या विद्यार्थ्याने जिद्दीने अपंगत्वावर मात करून इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ५२ टक्के गुण मिळवले आहेत. त्याच्या या यशामुळे त्याच्या आई-वडिलांना विशेष आनंद झाला आहे.
सिद्धार्थांचा जन्म पुण्यात झाला. सातमाशी जन्मलेल्या मुलाला जन्मताच मेंदूच्या पक्षघाताचा आजार होता. त्यामुळे त्याला अपंगत्व आले. जन्मत: अपंग असलेल्या सिद्धार्थचे चांगले संगोपन करण्यावर त्याच्या आई-वडिलांनी भर दिला. त्याची आई मंजिरी ही अकाऊंट मॅनेजर या पदावर होती. सिद्धार्थच्या जन्मानंतर त्याला वेळ देण्यासाठी तिने नोकरी सोडली. सिद्धार्थचे वडील संदीप हे मॅकेनिकल इंजिनिअर आहेत.
सिद्धार्थवर सुरुवातीला फिजोथेरीपीस्ट व्यंकटेश मणूरकर व प्रल्हाद अंकमाची या डॉक्टरांनी उपचार केले. तसेच मुंबईच्या हाजीअली येथील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉ. निषाद ठाकूर यांनी त्याला प्रशिक्षण दिले. त्यामुळे सिद्धार्थ इमारतीच्या पायऱ्या स्वत: चढतो. मात्र घरात त्याला वॉकरची मदत घ्यावी लागते.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सिद्धार्थने चंद्रकांत पाटकर शाळेत घेतले आहे. शाळेत पहिलीपासून त्याला मदतनीस घेऊन परीक्षा द्यावी लागली. सिद्धी वालावलकर हिने दहावी व अकरावीचे पेपर लेखन केले आहे. त्याचे बारावीचे पेपर लेखन आरती डोलारे आणि सिध्दी यांनी केल. प्रयास प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी बेल्हे यांनी लेखन सुधारण्याचे प्रशिक्षण सिद्धार्थला दिले आहे. त्याचे अक्षर सुधारण्यासाठी त्याला मार्गदर्शन केले. सिध्दार्थ हा जास्त वेगाने लेखन करू शकत नाही. त्यामुळे त्याला लेखनिक घ्यावा लागतो. त्याला वाचलेले चांगले लक्षात राहते. त्याने १२ वी कला शाखेसाठी संस्कृत ही भाषा घेतली होती. त्याच्या परीक्षेचे केंद्र स्वामी विवेकानंद शाळेत आले होते. त्याला संस्कृत विषयात ४९ गुण मिळाले आहेत. त्याला सर्व विषयात ५२ टक्के गुण मिळाले आहेत.
संस्कृतमध्ये एम.ए करण्याचे स्वप्न
महाविद्यालयीन जीवनात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सिध्दार्थने सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी ‘वेदकालीन वाङ्मय’ या विषयावर संवाद साधला. त्याला संस्कृत या विषयात एम.ए करायचे आहे. संस्कृतमध्ये पदवी व पदव्युतर शिक्षण घेण्याची सोय डोंबिवलीत नसल्याने त्याचा शोध त्याची आई-वडील घेत आहेत.