दहीहंडीला पावसाची दमदार हजेरी, गोविंदा पथकांमध्ये नाराजी
By अजित मांडके | Published: September 7, 2023 03:18 PM2023-09-07T15:18:47+5:302023-09-07T15:19:02+5:30
गुरुवारी हवामान खात्याने पावसाच्या हलक्या तर शुक्रवारीपासून पुढे पावसाची शक्यता वर्तवली होती.
ठाणे : हवामान खात्याने हलक्या पावसाच्या सरीचा अंदाज वर्तवला असताना, गुरुवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचे बरसने दुपारी बारा वाजेपर्यंत सुरूच राहिल्याने गोंविदांच्या आनंदावर विरजण पडले. ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथकांनी मानाच्या आणि मोठ्या हंड्यांच्या ठिकाणी हजेरी लावली. तरी काहींनी मानवी मनोरे उभारण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान दरवर्षी खिडकीतल्या ताई आता वाकू नका... दोन पैसे देतो मला तुम्ही भिजून टाका. ही धून वाजण्यापासून वरूनराजाने ठाण्यात धडकलेल्या गोविंदा पथकाना अक्षरशः चिंब करून टाकले. वरून राजाच्या आगमनाने मात्र आयोजक आणि गोविंदा पथकांमध्ये नाराजी पाहण्यास मिळाली. मात्र उत्साह कणभर कमी झाल्याचे दिसून आले नाही.
गुरुवारी हवामान खात्याने पावसाच्या हलक्या तर शुक्रवारीपासून पुढे पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र गुरुवारी पहाटे पासून ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी साडेसहा वाजल्यापासून साडेआठ वाजण्याच्या ३० मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर साडेअकरा वाजेपर्यंत पुन्हा ३१.२३ मिमी पाऊस झाला आहे. अशाप्रकारे एकूण ६१.२३ मिमी पावसाने हजेरी लावल्याने दहीकाला आयोजकांसह गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर उमठल्याचे पाहण्यास मिळत आहे.
तरीपण सकाळपासून मुंबईतील गोविंदा पथकांनी ठाण्याकडे येण्यास सुरुवात केली. तर काही पथकांनी ठाण्यात येत, मानाच्या आणि मोठ्या हंड्यांच्या हजेरी लावल्याचे पाहण्यास मिळू लागले. त्याचबरोबर पडणाऱ्या पावसात मानवी मनोरे उभारताना पथक दिसत होते. हे मानवी मनोरे उभारताना त्याचा उत्साह पावसाप्रमाणेच शिगेला गेल्याचे दिसत होते.