ठाण्यात जोरदार पावसाची हजेरी; सिध्देश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडली!
By अजित मांडके | Published: July 20, 2024 06:42 PM2024-07-20T18:42:14+5:302024-07-20T18:43:20+5:30
मागील २४ तासांत १०४.१० मिमी पावसाची नोंद
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यात पावसाने आता मागील दोन ते तीन दिवसापासून चांगलीच हजेरी लावली आहे. त्यात शुक्रवारी रात्री पासून सुरु झालेल्या पावसाने शनिवारी दिवसभर मुक्काम ठेवल्याचे दिसून आले. तर मागील २४ तासात ठाण्यात १०४.१० मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर शनिवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३२.७४ मीमी पावसाची नोंद झाली. शहरात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते. तर शहरातील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर सिध्देश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
ठाण्यात पावसाने आता मुक्काम करण्यास सुरवात केली आहे. मागील काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. त्यामुळे वातावरणात देखील कमालीचा गारवा पसरला आहे. शुक्रवारी रात्री पासून पावसाने शहराच्या विविध भागात दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे शुक्रवार ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात तब्बल १०४.१० मीमी पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळी पहिल्या सत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३२.७४ मीमी पावसाची शहरात नोंद झाली. त्यामुळे शहरातील बारा बंगला परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, पेढ्या मारुती मंदिर, वंदना सिनेमा समोर आदींसह शहरातील इतर भागातही पाणी साचल्याचे दिसून आले. परंतु ठाण्यातील महत्वाच्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी या पाण्यातून वाटसरुना मार्ग काढून देतांना दिसून आले. तर ठिकठिकाणी महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी लावलेल्या पंपामुळे पाणी फार वेळ साचून राहिले नसल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले.
दुसरीकडे याच पावसात सकाळी सिध्देश्वर तलाव परिसरात मिताली बिल्डींग समोर रस्त्याची सुरक्षा भिंत पडल्याची घटना घडली. ही भिंत २० फुट लांब तर १० फुट उंच होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या इमारतीचा धोकादायक झालेला भागही पाडण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी देखील सुरक्षेच्या कारणास्तव याठिकाणी धोका पट्टी लावण्यात आली होती.