ठाण्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:52+5:302021-06-18T04:27:52+5:30
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात बुधवारी दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने गुरुवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. ठाण्यात दुपारनंतर ...
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात बुधवारी दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने गुरुवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. ठाण्यात दुपारनंतर पावसाने जोर धरल्याचे दिसून आले. त्यामुळे सायंकाळपर्यंत ८३.७८ मिमी पावसाची नोंद झाली. तर शहरातील विविध सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाला. शहरात पाच ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. वर्तकनगरला घराची शेड कोसळल्याची घटना घडली. मात्र, यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
गुरुवारी ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर शहरावर काळे ढग दाटून आले होते. सकाळच्या सत्रात म्हणजेच दुपारी दीड वाजेपर्यंत ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, दुपार नंतर पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे दिसून आले. दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने वंदना, राम मारुती रोड, महापालिका मुख्यालय समोर ही पाणी साचले होते. तसेच कोपरीतील लवकुश सोसायटी परिसरात पाणी साचले होते, तुर्फेपाडा, पुष्पांजली रेसिडेन्सी परिसर, जगन्नाथ भगीरथ सोसायटी आदींसह इतर सखल भागात पाणी साचल्याचे घटना घडल्या आहेत. महापालिकेने पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावले होते. तर शहरातील पंचशील अपार्टमेंट मुंब्रा, कलेक्टर बंगला परिसर कोपरी, साईबाबा विहार कॉम्प्लेक्स घोडबंदर, वृंदावन सोसायटी बसस्टॉप आदी ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. तसेच बारा बंगला परिसरात वृक्षाची फांदी पडल्याची घटना घडली. याशिवाय शहरातील तीन ठिकाणी वृक्ष धोकादायक अवस्थेत असल्याच्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाल्या. दुपारनंतर शहरात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. दुपारी दीड वाजेपर्यंत ३० मिमी पावसाची नोंद शहरात झाली होती. परंतु,सांयकाळी साडेपाचपर्यंत शहरात ८३.७८ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी देखील पावसाचा जोर वाढल्यामुळे महापालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली होती.