ठाणे जिल्ह्यात पावसाचा धुडगूस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 03:59 AM2018-07-08T03:59:02+5:302018-07-08T03:59:28+5:30
शुक्रवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात गावोगावी धुडगूस घातला असून, नदीनाल्याकाठच्या गावांना पाण्याचा विळखा आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसार उद्ध्वस्त झाले.
ठाणे- शुक्रवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात गावोगावी धुडगूस घातला असून, नदीनाल्याकाठच्या गावांना पाण्याचा विळखा आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसार उद्ध्वस्त झाले.
भिवंडी तालुक्यातील वारणा व कामवारी नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील खाडीकिनारी असलेल्या म्हाडा कॉलनी, अजयनगर, अंबिकानगर, बंदर मोहल्ला भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.
कल्याणनजीकच्या वालधुनी नदी परिसरातील शिवाजीनगरमधील अनेक घरांत पाणी शिरले. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात बसला असून, ठिकठिकाणी रेल्वेरुळ पाण्यात गेल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. कल्याण-मुरबाड रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत ठप्प होती. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. वासिंद पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेपुलाखालील पाण्यामुळे शहापूर, कल्याण तालुक्यांतील ४२ गावांचा संपर्कतुटला. कल्याण-डोंबिवली परिसरात १५ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
कल्याण-डोंबिवली शहराला झोडपले
कल्याण-डोंबिवली शहरांत शनिवारी पहाटेपासूनच कोसळणाºया धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे शहरे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर नाले तुडुंब भरून वाहू लागले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली.
भिवंडी शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने अजयनगर, शिवाजी चौक, शिवाजीनगर मार्केट, नझराना कम्पाउंड, नवीचाळ, तानाजीनगर आदी भागात शिरले. अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिरालाही पावसाचा फटका बसला. मंदिराशेजारील वालधुनी नदी दुथडी भरून वाहत होती.
ठाणे शहरात सखल भागात साचले पाणी
ठाणे शहरात शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेगही काहीसा मंदावला होता. सायंकाळपर्यंत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस बरसला. शहरात अनेक ठिकाणी वृक्ष पडणे, मुंब्य्रात नाल्याची भिंत पडण्याची घटना घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.