ठाण्यात पावसाची तिसऱ्या दिवशीही जोरदार बॅटिंग, २७ ठिकाणी पाणी भरल्याच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:56 AM2020-07-06T00:56:07+5:302020-07-06T00:56:50+5:30
रविवारी पहाटेपासूनच शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. पहाटे १२ ते २ या अवघ्या दोन तासांमध्येच २८.९५ मिली मीटर पावसाची नोंद झाली. लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, नौपाडा, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर रोड या सर्वच परिसरात नाले आणि रस्त्यांवर पाणी साचले होते.
ठाणे : सलग तिसºया दिवशी ठाणे शहर तसेच कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. धुवाँधार पावसामुळे ठाणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पहाटेपासून कोसळणाºया पावसाने दुपारी काहीशी विश्रांती घेतली. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या अवघ्या आठ तासांमध्येच शहरात ९०.६६ मिली मीटर पावसाची नोंद झाली. शहरातील १५ ते २० ठिकाणी झाडे पडली. तर २७ ठिकाणी पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
रविवारी पहाटेपासूनच शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. पहाटे १२ ते २ या अवघ्या दोन तासांमध्येच २८.९५ मिली मीटर पावसाची नोंद झाली. लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, नौपाडा, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर रोड या सर्वच परिसरात नाले आणि रस्त्यांवर पाणी साचले होते. वंदना सिनेमा, मुंबई ठाणे पूर्व द्रूतगती राष्टÑीय महामार्ग आणि कोपरी येथील अनेक रस्त्यांवर पाणी होते.
टेंभीनाका येथील धोबी आळीतील मथुराबाई परदेशी चाळीजवळील एका इमारतीचा काही भाग पहाटेच्या सुमारास कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही.
वागळे इस्टेट, हाजूरी भागात सुमारे १० ते १२ फूट भिंत कोसळली. चंदनवाडीमध्येही कम्पाउंडची भिंत कोसळल्यामुळे जांभूळकर चाळ धोकादायक स्थितीमध्ये होती.
चरईतील दगडी चाळ शाळा, खाळकर आळी, कोपरीतील मिठ बंदर रोड, हिरानंदानी रोड, ब्रम्हांड, कोपरीतील शासकीय वसाहतीमधील बंगला क्रमांक १३, चिराग नगर, राबोडीतील कॅसल मिल, माजीवडा आदी १५ ते २० ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. या सर्व ठिकाणी ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने धाव घेऊन रस्ते मोकळे केले.
पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पहाटेपासूनच अनेक ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्या. यामध्ये प्रामुख्याने गोकूळनगर, ऋतू पार्क, माजीवडा, जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील आरटीओ कार्यालय, ठाणे रेल्वे स्थानक रोड, वागळे इस्टेट, कृषी विभाग कार्यालय, दिव्यातील अनेक भाग, पाचपाखाडी, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत परिसर, स्टेशन रोड, चेंदणी बंदर, मनिषा नगर कळवा आदी २७ ते ३० ठिकाणी पाणी भरल्याच्या तक्रारी होत्या. अनेक ठिकाणी ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यांमधील झाडे तसेच फांद्यांमुळे अडथळा निर्माण झालेल्या ठिकाणी मार्ग मोकळे केले.
तीन वाहनांवर पडली झाडे
मासुंदा तलाव येथेही नौका विहार इमारतीसमोर तीन वाहनांवर झाडे पडण्याच्या घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडल्या. सुदैवाने याठिकाणीही कोणी जखमी झाले नाही.
तर खारटन रोड येथे शितलादेवी मंदिरासमोरील मल:निसारण वाहिनीचे चेंबरही खचल्यामुळे नागरिकांनी त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.
धर्मवीरनगर, कोपरीतील आनंदनगर, वंदना सिनेमा, रतनभाई कम्पाउंड आदी आठ ते दहा ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्या
होत्या. सायंकाळनंतर हे पाणी ओसरले होते.