ठाण्यात पुढील ३ तास मुसळधार पाऊस; वाऱ्याचा जोर वाढणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:38 AM2021-05-17T11:38:49+5:302021-05-17T11:39:06+5:30
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुरबाड तालुक्यात १२.९ मिमी. तर भिवंडी तालुक्यात १२.६ मिमी. पाऊस पडला आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यासह मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत येत्या तीन तासांत पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी. वाहणार आहे, असे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांच्या कालावधीत सरासरी ११.५ मिमी. पाऊस पडला आहे. रात्रीच्या वेळी विजेच्या लपंडावास नागरिकांना तोंड द्यावे लागले. तर जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर शहाड टेमघरचा पाणी पुरवठा काही अंशी खंडीत झाला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुरबाड तालुक्यात १२.९ मिमी. तर भिवंडी तालुक्यात १२.६ मिमी. पाऊस पडला आहे. या खालोखाल ठाणे शहर व तालुक्यात ११.९ मिमी. पाऊस पडला असून शहापूरच्या १०.९ मिमी., कल्याणला ९.२मिम. उल्हासनगरमध्ये ६ मिमी, आणि अंबरनाथला ३.३ मिमी. पाऊस पडलेला आहे. या पावसा दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. रात्रभरापासून जिल्ह्यात कमी अधिक पाऊस पडत असल्याने हवेत गारवा वाढला आहे.
कल्याणच्या शहाड येथील विद्यूत पुरवठा रात्री ३.५० वाजता खंडीत झाल्यामुळे स्टेम प्राधिकरण मार्फत ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून त्याकरीता साधारणपणे २ ते ३ तास अपेक्षीत आहेत. म्हणून सध्या ठाणे शहर परिसरात पुढील २४ तास होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या समस्येसह ठाणे शहरात आगीच्या दोन किरकोळ घटना घडल्या आहेत. तर १३ झाडे उन्मळून पडले. सहा धोकादायक स्थितीत आहे . १३ झाडांच्या फांद्या तुटल्या. आता नुकतेच घंटाळी मंदिराजवळील एक झाड कारवर पडून नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून या झाडाला हटवून कार मोकळी करण्याचे काम हाती घेतले आहे.