ठाणे-पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2015 03:32 AM2015-07-22T03:32:40+5:302015-07-22T03:32:40+5:30

ठाणे व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात मध्यरात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन

Heavy rain in Thane-Palghar district | ठाणे-पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

ठाणे-पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

googlenewsNext

ठाणे : ठाणे व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात मध्यरात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. ठाणे जिल्ह्यात ९३१ मिमी पाऊस झाला असून सरासरी १३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
लोकल गाड्यांसह लांबपल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे चाकरमानी व रेल्वे प्रवाशांचे हाल झाले . कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली व भिवंडी शहरातील गटारांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूकीत अडथळा निर्माण झाला. दोन्ही जिल्ह्यातील नद्याना पूर आल्यामुळे गावांचा संपर्क तुटला. याशिवाय पालघर रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा दीर्घकाळ खंडीत होती. वसई तालुक्यातील अनेक गावांचा शहराशी असलेला संपर्क या पावसामुळे तुटला.
महिनाभर उसंत घेतलेल्या पावसाने सोमवार पासून शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे शहरात पाच ठिकाणी पाणी साचले होते, तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. श्रीनगर येथे नाल्याची गार्डनची संरक्षक भिंत पडली, तर मंगळवारी दुपारी उथळसर भागात पाण्याचा लोंढा वाढल्याने नाल्याची भिंतच पूर्णपणे खाली खचल्याने या नाल्यावर असलेली तीन मजली इमारतीला धोका निर्माण झाला. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या सहा कुटुंबांना आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. दरम्यान शहरात मागील २४ तासात ११३.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुपार पर्यंत २५ हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये महाराष्ट्र विद्यालय, वंदना, मासुंदा तलाव येथील शिवाजीच्या पुतळ्या जवळ आणि नामदेववाडी या भागात गुडघाभर पाणी साचले होते. तसेच वसंत विहार येथे एका स्कूलबसवर वृक्ष उन्मळून पडला. सुदैवाने यात कोणीही नसल्याने जिवीतहानी टळली. तसेच, लुईसवाडी भागातही तीन वाहनांवर वृक्ष पडल्याची घटना घडली. खोपट सिंगनगर, ब्रम्हांड फेस दोन येथेही दोन गाड्यांवर झाड पडले होते. विजय नगरी भागातही रस्त्यावरच वृक्ष पडले होते. श्रीनगर भागात उद्यानाची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली, परंतु यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मोघारपाडा भागात नाला तुंबल्याने येथील काही घरांमध्ये पाणी शिरले होते, याशिवाय हरदास नगर भागातही ड्रेनेज लाईनमध्ये बिघाड झाल्याने या भागातही पाणी साचले होते.
दुपारी उथळसर भागात नाल्याची भिंतच खचून नाल्याचा भरावच वाहून गेल्याने त्यावरील तळ अधिक दोन मजल्याच्या इमारतीला धोका निर्माण झाला, त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या सहा कुटुंबांना युध्द पातळीवर बाहेर काढण्यात आले. (लोकमत टीम)

संततधार पावसाने वालधुनी नदीला पूर आला असून गायकवाड पाडा, राजीव गांधीनगर, करोतीयानगर, राहुलनगर येथे घरात पाणी गेले आहे. तर शांतीनगर स्मशानभूमीत झाडे पडल्याची व कॅम्प नं-१ भाजी मार्केट शेजारील इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. उल्हासनगरात मध्यरात्री पाासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. शहाड परिसरातील राहुल गांधीनगर, राहुलनगर, कॅम्प नं-५ मधिल गायकवाड पाडा तसेच शांतीनगर करोतीया नगरातील १५ ते २० घरात पाणी घुसले होते. साचलेले पाणी नाल्यात सोडण्यात पालिका आपतकालीन विभागाला यश आल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरिक्षक विनोद केणे यांनी दिली आहे. तसेच कॅम्प नं-१ येथील भाजी मार्केट शेजारील इमारतीला आग लागली असून सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. शहरातील कॅम्प नं-४ शासकिय प्रसूतीगृह रूग्णालय, हिराघाट-विठ्ठलवाडी रस्ता, गुलशननगर, कॅम्प नं-३ परिसरातील स्टेट बँके समोर, छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाचा खालच्या सखल भागात पावसाचे पाणी तुंबले होते. तसेच वालधुनी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या घरात पाणी घुसले होते.
सोमवार पासून शहरांत व परिसरांत झालेल्या मुसळधार पावसाने शहरांतील सर्व व्यवहार ठप्प झाले. शहरांत येणाऱ्या तीन पुलावरून पाणी गेल्याने नागरिकांचा शहरांशी संपर्क तुटला. भिवंडी-वाडा रोडवरील कामवारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने मंगळवार सकाळपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे व नोकरदार वर्गांचे हाल झाले.
पाऊस रात्रभर कोसळत होता. कामवारी नदी आणि वसईची खाडी यांचा नदीनाका ते खाडीपार दरम्यान संगम झाल्यानंतर पाणी शहरांतील विविध भागात शिरले. बंदरमोहल्लाचा खाडीपुल, अजयनगर पुल, व भिवंडी-वाडा मार्गावरील नदीनाक्यावरील पुल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली. वाडा मार्गावरून अहमदाबादकडे जाणारी वहाने इतर मार्गे वळविण्यात आली. नेहमीप्रमाणे शिवाजीनगरमधील निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये पाणी घुसल्याने पोलीस ठाण्याचे कामकाज स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये सुरू होते. पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी होडीतून जाऊन निजामपूर पोलीस ठाण्याची पाहणी केली. शिवाजीनगर व ठाणगेआळीतील रहिवाशांच्या घरांत पाणी घुसल्याने तेथील ४० कुटुंबियांना त्या रंगायतनमध्ये तात्पुरता आसरा देण्यात आला. नदीनाका-म्हाडा कॉलनीमध्ये पाणी शिरल्याने तेथील शाळेत रहिवाशांची सोय करण्यात आली. पाऊस सुरू होऊन ठिकठिकाणी पाणी साचल्याने वीज कंपनीने शहरांतील बहुतांशी ठिकाणी वीज खंडीत केल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
४ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून आता या धरणाच्या स्वयंचलीत दरवाजांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्याचा फटका धरणपात्रात येणाऱ्या ६ गावांना बसणार आहे. तसेच एमआयडीसीने या गावांना लवकरात लवकर स्थलांतरी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
४महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या बारवी धरणाचे काम १९७२ मध्ये पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर१९८६ आणि १९९८ मध्ये या धरणाची उंची वाढवित ही क्षमता ३४०. ४८ दशलक्ष घनमी. एवढी करण्यात आली. मात्र उंची वाढली तर्री धरणातील पाणी साठा अद्याप वाढलेला नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारी सहा गावे आणि त्याला संलग्न असे ५ पाडे यांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. गावांच्या पुनर्वसनासाठी देण्यात आलेल्या मोबदल्यावरुन एमआयडीसी आणि गावकऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने या गावांनी अद्याप विस्थापन केलेले नाही. त्यामुळे धरणाची उंची वाढून देखील पाणी साठा वाढविण्याचे काम अद्याप झालेले नाही.
४धरणपात्रात असलेल्या तोंडली, मोहघर व संलग्न पाडे, काचकोली व संलग्न पाडे, कोळेवडखळ, सुकाळवाडी आणि मानिवली या गावांनी त्यांना नियोजित करुन दिलेल्या जागी अद्याप पुनर्वसन करुन घेतलेले नाही. या गावांसाठी सासणे गाव, म्हसा, तागवाडी, काचेकोली, चिमण्याची वाडी, फणसोली, वेहेरे आणि मुरबाड गावच्या हद्दीत पुनर्वसन करण्यासाठी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. रस्ते, शाळा, पाणी, समाजमंदिर, अंगणवाडी, स्मशानभूमी आणि आरोग्य केंद्रांची कामेही सुरु आहेत. मोबदल्याचा वाद संपला नसल्याने पुनर्वसन अडले आहे.
४धरणावर ११ दरवाजे बसविण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र पुनर्वसनाची कामे सुरू असल्याने धरणातील पाण्याचा लवकर निचरा होण्यासाठी ३ गाळ्यांचे काँक्रिटीकरण केलेले नाही.

टिटवाळा गेले पाण्यात
महिनाभराच्या उसंती नंतर सोमवारी सायंकाळी च्या सुमारास पावसाने जोरदार सुरवात केली. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी मात्र चाकरमान्याचे व इतर नागरिकांनाचे हाल झाले. या पावसाचा फटका कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या टिटवाळा प्रभागांमध्ये पाणी तुंबल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.
सायंकाळी सातच्या सुमारास पावसाने जोरदार सुरवात केली. रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे टिटवाळा शहरात जागोजागी पाणी तुंबल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.
स्टेशन परिसर, दळवीवाडा, सुमुख सोसायटी, सावरकर नगर परिसर, निमकरनाका, ओमसाई अपार्टमेंट, केतकर चाळ, ओमवर्षा सोसायटी आदी परिसरात पाणी तुंबले आहे. याचे कारण अमृत सिद्धि या बिल्डर ने भराव करु न जलाराम नाल्याची दिशा बदलून त्यावर बिल्डिंग बांधल्यामुळे व नाल्याची उंची व रु ंदी कमी केल्यामुळे पाणी भरले आहे.
अमृत सिद्धि या विकासकामुळे नाल्यात पाणी भरले आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेविका उपेक्षा भोईर गेल्या वर्षीपासून केडीएमसीच्या नगर रचना विभागाकडे पत्रव्यवहार करत आहेत. परंतु पालिका अधिकारी येतात व पाहणी करु न जातात. परंतु या बाबीवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याची खंत भोईर यांनी व्यक्त केली.

Web Title: Heavy rain in Thane-Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.