कल्याणमध्ये पावसाचा हाहाकार; भातसा, काळू व उल्हास या नद्यांना महापूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 12:15 PM2019-08-04T12:15:46+5:302019-08-04T12:16:03+5:30
कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तीनही नद्यांना महापूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
उमेश जाधव
टिटवाळा-: खडवली येथील भातसा पूर आल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने खडवली-पडघा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच भातयाच्या पुरामुळे खडवली नदीकाठच्या इंदीरानगर, ज्यु, आदीवासी आश्रम शाळा परीसर, स्वामीसमर्थ मठ परीसर येथील ७० ते ८० घरात पुराचे पाणी शिरले आहे. नागरिकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले. पाण्याखाली गेलेल्या घरातील नागरिकांना येथील स्थानिक लोकांकडून बाहेर काढण्यात येत असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येथील स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावले असून त्यांच्या निवार्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
दरम्यान रुंदी गावा जवळील पुल रविवारी सकाळपासूनच पाण्याखाली गेले होता तो आतापर्यंत पाण्याखालीच आहे. यामुळे लगतच्या भागातील रूंदे, आंबिवली, फळेगांव, मढ, उशिद, भोंगळपाडा, दानबाव, पळसोली, हाल, काकडपाडा आदी गावांतील दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच याच काळू नदीवर वासुंद्री गावा जवळील असणारा पुत्र देखील रविवारी सायंकाळपासून पाण्याखाली गेल्याने येथील सांगोडा, कोंढेरी, मोस, वासुंद्री व निंबवली या पाच ते सहा गावांचा संपर्क तुटलेला आहे.
कल्याण-मुरबाड महामार्गावर असणाऱ्या रायते गावाजवळ उल्हास नदीवरील पुलावरून देखील पुराचे पाणी गेले आहे. यामुळे या महामार्गावरील कल्याण- मुरबाड- नगर ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या मार्गावर जागोजागी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तसेच या चंद्रहास नदीचे पाणी रायते, कांबा, वरप, आणे व म्हारळ येथील नदीकाठच्या घरात शिरले आहे. या नदीकाठच्या गावातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
टिटवाळा रेल्व स्थानक ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर शिव मंदिरा लगत असणारा साकव या वरून पाच ते सहा फुट काळू नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. ह्या कारणास्तव या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. टिटवाळा मंदिर परिसरातील लोक पलीकडे तर रेल्वे स्थानक परिसरातील लोक अलीकडे अडकून पडली असल्याचे चित्र दिसून येते आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने येथील नारायण नगर रोडवर असणाऱ्या गणेश कृपा चाळीतील २५ घरे पाण्याखाली आहेत. तर सांडोडा रोड येथील २०० रूम पाण्याखाली गेल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी असल्याने रेल्वे वाहतूक देखील ठप्प झाली आहे. सध्या पावसाचा जोर अजूनच वाढला असल्याने आणखीन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते.