भिवंडीत पावसाची पुन्हा मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:24 AM2021-07-22T04:24:55+5:302021-07-22T04:24:55+5:30
भिवंडी : पावसाने मंगळवारी काहीशी उसंत घेतल्यानंतर बुधवारी भिवंडी शहरासह ग्रामीण भागाला अक्षरश: झाेडपून काढले. सकाळपासूनच पावसाने मुसळधार सुरुवात ...
भिवंडी : पावसाने मंगळवारी काहीशी उसंत घेतल्यानंतर बुधवारी भिवंडी शहरासह ग्रामीण भागाला अक्षरश: झाेडपून काढले. सकाळपासूनच पावसाने मुसळधार सुरुवात केल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर रस्त्यांवर पाणी साचल्याने शहरातील मुख्य रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.
भिवंडीतील धामणकरनाका, कमला हॉटेल, कल्याणनाका, नदीनाका, इदगाह, भाजी मार्केट, गुलझारनगर या भागांत पाणी साचले होते. तर अंजुरफाटा कल्याणनाका या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने या रस्त्यावर वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. रस्त्यांवर पाणी साचल्याने चाकरमान्यांचेही मोठे हाल झाले.
भिवंडी-ठाणे रस्त्यावरील पूर्णा आणि राहनाळ येथे रस्त्यावर पाणी साचल्याने या ठिकाणी काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. तर अंजुरफाटा, माणकोली, चिंचोटी या मार्गावर माणकोली, दापोडा आणि नारपोली बहात्तर गाळा या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले हाेते. तर भिवंडी-वाडा महामार्गावर नदीनाका, मिठापाडा परिसरात पाणी साचल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना रस्त्यावरून गुडघाभर पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लावला. तर दर्गारोड-कारिवली रस्त्यावरही पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.
दुकाने, झाेपड्यांमध्ये पाणी
कल्याणनाका परिसरात पाणी भरल्याने साचलेले पाणी थेट व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुकानातून पाणी बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांना कसरत करावी लागली. तर इदगा परिसरातील नदीकिनारी असलेल्या झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरून नागरिकांचे मोठे हाल झाले. तीनबत्ती-निजामपुरा भाजी मार्केटमध्येही पाणी शिरले हाेते. त्यामुळे येथील भाजी विक्रेत्यांचे प्रचंड हाल झाले.