जोरदार पावसाचा पक्ष्यांना फटका, काही पक्षी परतीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:28 AM2018-07-16T03:28:11+5:302018-07-16T03:28:13+5:30
जोरदार पावसाचा फटका ठाण्यातील ४५ दुर्मीळ पशुपक्ष्यांना बसला असून गेल्या काही दिवसांमध्ये पावसात भिजल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन गारठलेल्या अवस्थेत दुर्मीळ पशुपक्ष्यांना ठाणे एसपीसीए संस्थेत तातडीने उपचार करण्यात आले.
- पंकज रोडेकर
ठाणे : जोरदार पावसाचा फटका ठाण्यातील ४५ दुर्मीळ पशुपक्ष्यांना बसला असून गेल्या काही दिवसांमध्ये पावसात भिजल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन गारठलेल्या अवस्थेत दुर्मीळ पशुपक्ष्यांना ठाणे एसपीसीए संस्थेत तातडीने उपचार करण्यात आले. यामध्ये १७ घारी तर ९ घुबड यांच्यासह दोन गरुड, एक किंगफिशरसारख्या पक्ष्यासह पहिल्यांदाच पावसाळ्यात दाखल झालेल्या सहा कासवांचा समावेश आहे.
ठाणे, घोडबंदर, डोंबिवली, विरार, मुलुंड आणि भांडुप या परिसरातील हे पक्षी असून २२ पक्ष्यांना येऊरच्या जंगलासह वेगवेगळ्या परिसरात सोडण्यात आले. यंदा मान्सूनपूर्व पावसापासून खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली. त्यामध्ये जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली.
त्यातच जोरदार वाºयामुळे आणि पावसाळ्यात झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याने पक्ष्यांचे निवारे नष्ट झाले आहेत. त्यातच, निवारा नसल्याने पावसात भिजण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
पावसात भिजल्यावर त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे काही पक्ष्यांना न्यूमोनियासारखा आजार होतो. पावसाने गारठलेल्या अवस्थेतील पशूंना पाहून प्राणिमित्र त्यांचे प्राण वाचवण्यासाठी ठाणे, ब्रह्मांड येथील पशुप्राण्यांवर उपचार करणाºया संस्थेत धाव घेत, त्यांना उपचारार्थ दाखल करतात.
अशा प्रकारे १ जून ते १५ जुलैदरम्यान साधारणत: ४५ दुर्मीळ पशुपक्षी उपचारार्थ दाखल झाले असून त्यातील २२ पक्ष्यांना उपचारानंतर मुक्तसंचारासाठी सोडून दिले आहेत. या दिवसांत जखमी होऊन दाखल झालेल्या पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने घुबड आणि घारींचा समावेश सर्वाधिक आहे. १७ घारी आणि ९ घुबडांसह सहा कासव, पाच पानबगळे आणि प्रत्येकी दोन कोकिळा, गरुड, मैना यांचा समावेश आहे.
उर्वरित २३ पशुपक्ष्यांवर मागील काही दिवसांंपासून उपचार सुरू असून येत्या ८ ते १० दिवसांत त्यांना येऊर, कर्नाळा किंवा ज्याज्या परिसरातून आणले, त्यात्या परिसरात मुक्तसंचारासाठी सोडले जाणार आहे. मागील वर्षी याच दिवसांत ३० पक्षी दाखल झाले होते. यावर्षी ही संख्या वाढल्याचे उपचार करणाºया संस्थेतील डॉक्टरांनी सांगितले. या पक्ष्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.
>पक्ष्यांच्या संख्येत वाढ
या पक्ष्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास व्यवस्था केली आहे. तसेच त्यांना शक्तिवर्धक टॉनिक, व्हिटॅमिनचे ड्रॉप पाजण्यात येत आहेत. त्याचबरोबर या संस्थेच्या रुग्णालयात वेळप्रसंगी जखमी झालेल्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पशुपक्षी वैद्य डॉ. सुहास राणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यंदा मात्र, अशा पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली.