कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:22+5:302021-07-20T04:27:22+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासांत १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी ...
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासांत १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. पावसामुळे वाहतूक कोंडी होऊन जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून धरणातील पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
दमदार पावसामुळे वालधुनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे वालधुनी आणि शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील नागरिकांच्या घरांत पाणी शिरले आहे. महापालिकेने वेळीच दखल घेत १०० पेक्षा जास्त कुटुंबांना पाणी शिरलेल्या भागातून अन्यत्र हलविले आहे. कोळेगाव परिसरातील घरांत पाणी शिरले. त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने नागरिकांना फूड पाकिटे वाटल्याची माहिती प्रभाग अधिकारी भारत पवार यांनी दिली आहे. कासा रिओ येथील नाला दुथडी भरून वाहत आहे. त्याचबरोबर नांदिवली परिसरात पाणी शिरले आहे. कल्याण स्टेशन परिसरातील मोहम्मद अली चौक ते एसीपी कार्यालयापर्यंत रस्त्यावर पाणी साचले होते. शिवाजी चौकातही पाणी साचले होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कल्याण-मुरबाड रोडवरील वरप, कांबा, म्हारळ यादरम्यान रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. कल्याण-शीळ रस्त्यावरही पाणी साचले होते. या भागातही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कल्याण उल्हासनगर मार्गावरील वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांत १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण अतिवृष्टीचे आहे. रविवारी रात्रीपासून नागरिकांच्या घरांत पाणी शिरण्याच्या काही घटना सखल भागात घडल्या आहेत. त्याठिकाणच्या नागरिकांना इतरत्र हलविले जात आहे. त्यांना फूड पाकिटे पुरविण्याचे काम केले जात आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता भरतीची वेळ आहे. पाऊस थांबला नाही तर भरतीच्या वेळी महापालिका प्रशासन सखल भागात जास्त लक्ष ठेवणार आहे.
--------------------------------