ठाण्याला मुसळधार पावसाने झोडपले, १०३ मिमी. पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 02:15 AM2020-07-08T02:15:51+5:302020-07-08T02:16:39+5:30
ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी काही काळ विश्रांती घेतली होती. मंगळवारी सकाळपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली.
ठाणे : मंगळवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपून काढले. शहरात विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान, घरांचीही पडझड अशा २० घटना घडल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. मात्र, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मागील १२ तासांत ठाण्यात १०३.०८ मिमी. पावसाची नोंद झाली.
ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी काही काळ विश्रांती घेतली होती. मंगळवारी सकाळपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. पाचपाखाडी भागातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. वसंत विहार, महागिरी कोळीवाडा आणि चिरागनगर भागात झाडे उन्मळून पडल्याने तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. वसंत विहार आणि मुंब्रा अग्निशमन केंद्र येथे झाडाच्या फांद्या पडल्याने चार वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच यशोधननगर येथे इमारतीच्या खाली पार्किंगमधील दुचाकी वाहनांवर झाडे पडल्यामुळे पाच दुचाकींचे नुकसान झाले. संपूर्ण शहरात अशा २० घटना घडल्या.
ठाणे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेल्या नगर भूमापन अधिकारी कार्यालयात पाणी भरल्याने रेकॉर्ड खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
माजिवडा, तीन हात नाका येथे साचले पाणी
माजिवडा, कोर्ट नाका, जांभळी नाका, शिवाजीनगर, आनंदनगर, महापालिका कार्यालयाजवळील परिसर, वंदना सिनेमागृह, कापूरबावडी, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, मुलुंड चेक नाका भागात पाणी साचले होते. शहरात मेट्रोची कामे सुरू असलेल्या तीनहात नाका परिसरातही पाणी साचले होते.