जिल्ह्यात रडार घेणार वादळी पावसाचा वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:41+5:302021-05-08T04:42:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आगामी पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महापालिका, शासकीय कार्यालयांमध्ये आपत्ती नियंत्रण, व्यवस्थापन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आगामी पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महापालिका, शासकीय कार्यालयांमध्ये आपत्ती नियंत्रण, व्यवस्थापन व मदत कक्ष सुरू करण्यात आले, याशिवाय जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा आधीच अचूक अंदाज प्राप्त करून देणाऱ्या रडारच्या नियोजनासह जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांच्या आवारात वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्याचे नियोजन जिल्हाभर करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना वेळीच योग्य माहिती देण्यासाठी, आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील यंत्रणांकडून विविध स्वरूपाची माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांमध्ये वीज प्रतिरोधक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मुरबाड तालुक्यातील न्याहाळी आणि तुरळक या गावांच्या परिसरात वीजप्रतिरोधक यंत्रणा सज्ज आहे. शहापूरच्या खर्डी परिसरातील वीजप्रतिरोधक यंत्रणा मात्र कालबाह्य झाल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.
वीज संकटाची चाहूल लागणार
जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी वीज पडून जीवितहानीच्या घटना घडत असतात. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात वीज प्रतिरोधक यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. लोक एकत्र येणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी म्हणजे बसस्थानकाच्या परिसराचे सर्वेक्षण करून तेथे वीज प्रतिरोधक यंत्रणा उभारण्यात येत आहे. यामुळे या सार्वजनिक ठिकाणी पडणाऱ्या संभाव्य विजेच्या संकटाची जाणीव आधीच होऊन तेथील जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे.
------