पेट्रोल पंपांवर वाहनांची प्रचंड गर्दी; भाजीपाला २० टक्के महाग; जांभळी नाका, गावदेवी मार्केटमध्ये आवक घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:39 PM2024-01-04T14:39:15+5:302024-01-04T14:40:26+5:30

या संपाचा फटका भाजीपाल्याला बसला असून, संपामुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेला जांभळी नाका, गावदेवी मार्केट येथे आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे भाव वधारले होते.

Heavy traffic at petrol pumps; Vegetables 20 percent more expensive; Inflow decreased in Jambli Naka, Gawdevi market | पेट्रोल पंपांवर वाहनांची प्रचंड गर्दी; भाजीपाला २० टक्के महाग; जांभळी नाका, गावदेवी मार्केटमध्ये आवक घटली

पेट्रोल पंपांवर वाहनांची प्रचंड गर्दी; भाजीपाला २० टक्के महाग; जांभळी नाका, गावदेवी मार्केटमध्ये आवक घटली

ठाणे : ‘हिट ॲण्ड रन’ कायद्याच्या विरोधात ट्रकचालकांनी पुकारलेला संप मागे घेतला असला तरी सर्वसामान्यांना आणखी एक ते दोन दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ठाण्यातील पेट्रोल पंपांवर बुधवारी सकाळीही गर्दी होती. सकाळच्या पहिल्या सत्रात ज्या पंपांवर पेट्रोल मिळत होते, त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १ वाजेनंतर बहुतांश पंपांवर पेट्रोल आल्याने वाहनचालकांनाही काहीसा दिलासा मिळाला;  परंतु या संपाचा फटका भाजीपाल्याला बसला असून, संपामुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेला जांभळी नाका, गावदेवी मार्केट येथे आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे भाव वधारले होते.

टँकर चालकांच्या संपानंतर अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती. संप मागे घेतल्यानंतर आता ही गर्दी ओसरली आहे. सोमवारी मध्यरात्री आणि मंगळवारी सकाळपासून सर्वच पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मंगळवारी सायंकाळी संप मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर हळूहळू पेट्रोल पंपावरील वाहनांची गर्दी कमी झाली. आज दिवसभर सर्वच पेट्रोल पंपांवर नेहमीप्रमाणे तुरळक गर्दी दिसत होती.

वाटाणा १६० रुपये किलो
-  या संपामुळे भाज्यांची आवकही काही प्रमाणात घटली. ठाण्यातील बाजारात दिवसा ३०० ते ४०० गाड्या येतात. संपामुळे फक्त ५० ते १००  गाड्याच मार्केटमध्ये आल्या होत्या. 
-  त्यातही  वाटाणा हा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशहून येत असल्याने या ठिकाणाहून येणाऱ्या गाड्या बंद झाल्यामुळे सध्या असलेल्या  मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. 
-  ८० रुपये किलोने मिळणारा वाटाणा आता १६० रुपये किलो झाला आहे. बाकीच्या भाज्यांमध्ये १० ते २० टक्के वाढ झालेली आहे. 
-  सध्या भाज्यांचे दर वाढल्याने ग्राहकही कमी झाले आहेत, असे विक्रेते विजय पाटील यांनी सांगितले.

पेट्रोल संपल्याचे फलक पंपांवर
-  संपामुळे शहरातील सर्व पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यासाठी मंगळवारी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 
-  सर्वच पेट्रोलपंपांवर इंधन संपल्याने नागरिकांना भटकंती करावी लागली. संप मिटला तरीही बुधवारी पंपांवर पेट्रोल नसल्याचे फलक लावण्यात आले होते. 
 

Web Title: Heavy traffic at petrol pumps; Vegetables 20 percent more expensive; Inflow decreased in Jambli Naka, Gawdevi market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.