भिवंडीतील उड्डाणपुलावर अडकले भारत पेट्रोलियमचा बॉयलर कॉलमचे अवजड वहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:20 PM2018-09-28T17:20:52+5:302018-09-28T17:36:00+5:30
भिवंडी: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईकडे जाण्यासाठी अहमदाबाद रोडने तालुक्याच्या हद्दीत शिरलेल्या भारत पेट्रोलियमचा १६० फुटी बॉयलर कॉलमचे अवजड वहान अखेर आज सकाळी वंजारपाटी नाक्यावरील एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर अडकून पडले. त्यामुळे शहरातून वाडा व नाशिककडे जाणारी वहातूक कोलमडून पडली आहे. त्यामुळे जालेल्या वहातूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले होते.
मुंबईतील चेंबूर येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडचे गोदाम असुन तेथे रिफायनरीसाठी लागणारे बॉयलर कॉलम गुजरात तारापुर-बोईसरवरून मुंबईतील चेंबूर येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गाने जाण्याऐवजी ग्रामिण वहातूक पोलीसांशी अर्थपुर्ण व्यवहार करीत हे ४० चाकी अवजड वहान अहमदाबाद मार्गे भिवंडी तालुका हद्दीत शिरले. तसेच स्व. राजीवगांधी उड्डाणपुलावरून जाण्यासाठी शेलार मार्गे काल गुरूवार रोजी पहाटे ४ वाजता शहरात बागेफिरदोस येथे आले.परंतू या पुलावर जड वहानांना बंद केल्याने हे बॉयलर कॉलम काल दिवसभर शहरातील बागे फिरदोस भागात एका बाजूला उभे होते. आज पहाटेच्या सुमारास वहानांची वर्दळ कमी झाल्यानंतर शहर वहातूक पोलीसांच्या मदतीने हे जड वहान नदीनाक्यांपर्यंत मागे नेले. त्यानंतर नाशिकमार्गे महामार्गावर जाण्यासाठी एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर चढविले. मात्र पुलावर वळण घेताना १६० फुटी बॉयलर कॉलमचा धक्का पुलावरील पथदिव्यांना लागला.त्यामुळे मनपाच्या वीज विभागाने उड्डाणपुलावरील दोन पथदिवे काढून या वहानास जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. एमएमआरडीएच्या पुलावर हे अवजड वहान सकाळपासून आडवे उभे राहिल्याने पुलावरील वहातूत खंडीत झाल्याने पुलाखाली वहानांनी गर्दी केली होती. त्यामुळे नदीनाका ते कल्याणरोड भागात वहातूक कोंडी झाली होती. त्यातच आज बागेफिरदोस येथे शुक्रवारची नमाज असल्याने या मार्गावरून जाणारी वहातूक खोळंबली होती.त्यामुळे एस.टी.प्रवाशांचे व विद्यार्थीवर्गाचे हाल झाले.