अवजड वाहनांची वाहतूक अजूनही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:57 PM2019-07-12T23:57:56+5:302019-07-12T23:58:08+5:30
कोपर दिशेकडील उड्डाणपूल : अध्यादेशातील तांत्रिक घोळ, नियोजनाच्या अभावाचा फटका
अनिकेत घमंडी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने त्यावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी, असा आदेश गुरुवारी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढला होता. मात्र, अध्यादेशात अवजड वाहनांच्या यादीत शाळा आणि परिवहनच्या बसचाही चुकून उल्लेख झाल्याने तो वगळून सुधारित अध्यादेश काढण्यासंदर्भातील घोळ तसेच प्रवेशबंदीचे फलक न लागल्याने शुक्रवारी या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती.
आयआयटीच्या तज्ज्ञांनी केलेल्या पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार हा पूल कमकुवत झाल्याने तो वाहतुकीसाठी तत्काळ बंद करावा व त्याची डागडुजी करावी, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने २० मे रोजी केडीएमसीला पत्र देऊन पूल वाहतुकीस बंद करावा, असे सूचवले आहे. मात्र, महापालिकेने या कामासाठी निधी कोण देणार, असा सवाल केला होता. तर, ३० मे रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनीलकुमार जैन यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी पुलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेनेच खर्च करावा, अशी मागणी शिंदे यांनी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली होती. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु, खर्चाचे कोटेशन तसेच पुलाची पुन्हा आयआयटीच्या तज्ज्ञांनी पाहणी करावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, अद्याप ठोस हालचाल झालेली नाही. आयआयटीतज्ज्ञांना पत्र, स्मरणपत्रेही दिली. परंतु, त्यांच्या उत्तराची आम्ही प्रतीक्षा करत असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.
अवजड वाहनांसाठी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेकडून सूचना मिळताच महापालिकेने जूनमध्ये वाहतूक पोलिसांना पत्र देत त्याची अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे. वाहतूक विभागाने दोन दिवसांपूर्वी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या. पण, त्याची अंमलबजावणी कशी करायची, या दृष्टीनेच शुक्रवारी शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे नियोजन सुरू होते.
शाळा, परिवहनच्या बसबाबत संदिग्धता : वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार १२ टनांवरील वाहनांचा अवजड वाहनांमध्ये समावेश होतो. त्यात शाळा, केडीएमटी आणि एनएमएमटीच्या बस मोडत नाहीत. मात्र, वाळूचे ट्रक, डम्पर, सिमेंट, मालवाहू वाहनांचा समावेश होतो. त्यामुळे शाळा व्यवस्थापनांना दिलासा मिळाला असला, तरी काही पालकांचा या पुलावरून वाहतुकीला विरोध आहे.