भाईंदर-बीपीटी-जेएनपीटीदरम्यान अवजड वाहतुकीसाठी जलमार्ग, भाईंदर-बीपीटी-जेएनपीटीदरम्यान अवजड वाहतुकीसाठी जलमार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 04:35 AM2020-03-20T04:35:12+5:302020-03-20T04:35:50+5:30
जहाजबांधणी मंत्रालयाने भिवंडी-ठाणे-जेएनपीटी या मार्गावर दररोज धावणाऱ्या सुमारे १००० अवजड वाहनांसाठी भाईंदर-मुंबई पोर्ट ट्रस्ट-जेएनपीटी या दरम्यान पर्यायी जलमार्ग सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.
ठाणे - ठाणे शहरावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा लॉजिस्टिक विभाग समन्वयाचे काम करण्यासाठी सिद्ध आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालय, रेल्वे आणि जहाजबांधणी मंत्रालयानेही यासाठी समन्वयाने काम करण्याची भूमिका घेतली आहे.
रेल्वेने उरण-भिवंडी-बोईसर या मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली असून, जहाजबांधणी मंत्रालयाने भिवंडी-ठाणे-जेएनपीटी या मार्गावर दररोज धावणाऱ्या सुमारे १००० अवजड वाहनांसाठी भार्इंदर-मुंबई पोर्ट ट्रस्ट-जेएनपीटी या दरम्यान पर्यायी जलमार्ग सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. शिवाय वसई, मीरा-भार्इंदर-ठाणे मार्गावर जल-टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत जेएनपीटीने सर्व पूर्वतयारी केली असून, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाद्वारे लवकर हालचाल झाल्यास हा प्रस्तावही पुढे जाऊ शकेल. या सर्व विषयांत राज्य सरकारनेही वेगाने पावले उचलली तर ठाणेकरांची वाहतूक तणावमुक्ती लवकर प्रत्यक्षात येऊ शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय जहाजबांधणीमंत्री मनसुख मांडविया यांनी ठाण्यात केले.
‘ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे’ या लोकाभियानांतर्गत खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या विनंतीवरून मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या लॉजिस्टिक विभागाने केंद्र, राज्य सरकार, रेल्वे, स्थानिक महापालिका, जेएनपीटी, एमबीपीटी व अन्य सरकारी यंत्रणा यांची समन्वय बैठक बोलाविली होती. तिच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी सहस्रबुद्धे यांनी बैठकीमागची भूमिका विशद केली.
या बैठकीस खासदार कपिल पाटील, मनोज कोटक, आमदार मंगलप्रभात लोढा, संजय केळकर, निरंजन डावखरे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी प्रभृती उपस्थित होते.
वसईजवळ मिठागरांच्या जमिनीवर लॉजिस्टिक पार्क
लॉजिस्टिक विभागाने अन्य मंत्रालयांच्या मदतीने आखलेल्या योजनेनुसार वसईजवळ मिल्टमोडल लॉजिस्टिक पार्कउभारण्यात येणार असून, ते प्रत्यक्षात आल्यानंतर अहमदाबादकडून येणाºया ट्रक्सना ठाण्यातच नव्हे तर मुंबईतही प्रवेश करण्याची आवश्यकता राहणार नाही. या संदर्भात मिठागरांची वापरात नसलेली जमीन उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे मनसुख मांडविया यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
येत्या २१ तारखेला खासदार सहस्रबुद्धे आणि डावखरे हे भाजप शिष्टमंडळासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठाण्यातील वाहतूककोंडीसंदर्भातील निवेदन
देणार आहेत.
‘वसई-ठाणे-कल्याण’साठी सागरमालातून निधी
वसई-ठाणे-कल्याण खाडीतील अंतर्गत जलमार्ग पुढील वर्षभरात विकसित होईल. या मार्गावर मे महिन्यापासून चाचणी घेतली जाईल. त्यातून ट्रकची वाहतूक करण्यासाठी सागरमाला प्रकल्पातून संपूर्ण निधी दिला जाईल. या मार्गासाठी आतापर्यंत १०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती मांडविया यांनी दिली.