सांस्कृतिक कार्यक्रमांवर टाच, चैतन्य हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:58+5:302021-02-15T04:34:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या कोविडमुळे यंदाच्या माघी गणेशोत्सवावरही पाणी फिरले आहे. कोणत्याही ...

Heel on cultural events, lost consciousness | सांस्कृतिक कार्यक्रमांवर टाच, चैतन्य हरवले

सांस्कृतिक कार्यक्रमांवर टाच, चैतन्य हरवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या कोविडमुळे यंदाच्या माघी गणेशोत्सवावरही पाणी फिरले आहे. कोणत्याही प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल न ठेवता अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याच्या अटींमुळे गणेशोत्सव होईल; परंतु त्यात पूर्वीसारखे चैतन्य नसेल असे मंडळांचे म्हणणे आहे. पण तरीही जागतिक महामारीला सामोरे जाताना कार्यकर्त्यांनी परंपरा सुरू ठेवण्यावर भर दिला आहे.

मुळात आधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध परवानगी काढताना नाकीनऊ आले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेचा तगादा आणि महापालिकेच्या नियमावलींची पूर्तता करताना मंडळे मेटाकुटीला आली. त्या नियमांची पूर्तता करून मंडळांना एक दिवस आधी पूर्वतयारीसाठी मिळाला, त्यामुळे इच्छा असूनही कार्यकर्त्यांना आकर्षक सजावट, देखावे वेळेअभावी उभारता आले नाही. डोंबिवलीत बहुतांश मंडळांनी मंडप, रंगीबेरंगी कापड उभारून उत्सवाचे स्वरूप देण्यात आले आहे. शहरात शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळ, महापालिकेच्या ग, फ प्रभाग कार्यालयाच्या इमारतीचा आवार, दत्तनगर, उर्सेकरवाडी, मंजुनाथ शाळेसमोर यासह पश्चिमेला आणि एमआयडीसी भागात काही मोजक्या ठिकाणी गणेशोत्सव होणार आहे. पण दरवर्षीसारखा उत्साह कार्यकर्त्यांत नसून एका मंडळातील कार्यकर्त्यांचे निधन झाल्याने केवळ पारंपरिक आणि प्रथेप्रमाणे गणेशोत्सव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कुठेही गर्दी होणार नाही, डीजे लावून ध्वनिप्रदूषण होणार नाही यासह महाप्रसाद वाटप आदी होऊ नये, पाणी, तीर्थ वाटप असे प्रकार होऊ नयेत अशी काळजी घेण्यात यावी, अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गर्दीचे नियोजन आणि कोरोना रोखणे यासाठी कार्यकर्ते स्वतःला सांभाळून सामजिक बांधीलकीच्या नात्याने सतर्क असल्याचे निदर्शनाला आले.

-------------------------------

कोट

कोरोना असल्याने गणेशोत्सव करण्याची मजा नाही हे वास्तव आहे. त्यातच मंडळाच्या कार्यकर्त्याचे नुकतेच निधन झाले. ते वातावरण आहेच; पण परंपरा, संस्कृती टिकवून प्रथेप्रमाणे यंदा माघी गणेशोत्सव करण्यात येणार आहे.

- संदीप नाईक, शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली पूर्व.

----------

आमच्या मंडळाचे यंदा ३५ वे वर्ष आहे. पण यावेळी परवानगी मिळवण्यापासून सगळ्या तांत्रिक अडचणी कार्यकर्त्यांना आल्या. प्रथा पूर्ण होणार आहेच. गणेशोत्सवाचा आनंद लुटायचा आहे. पण कोविडचे नियम पाळून हा मंत्र मंडळाला दिला आहे. यंदा दरवर्षीसारखा आकर्षक देखावा करता आला नसला तरी भक्तांनी यंदा सहकार्य करावे, पुढील वर्षी आणखी धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करू या.

- सुदेश चुडनाईक, अध्यक्ष, उर्सेकरवाडी गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली पूर्व.

-----------

फोटो आहे.

Web Title: Heel on cultural events, lost consciousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.